n लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महापालिकेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचण्या रेल्वे स्थानकांवरच करण्यास सुरुवात केली असून, बुधवारी एकूण ६ रेल्वे स्थानकांवर ९ हजार ७७९ रेल्वे प्रवाशांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यात १० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परिणामी कोरोनाचा वाढता धोका पाहता मुंबई महापालिका आणखी वेगाने कार्यरत झाली असून, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे.
मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे १ हजार ७९ रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. मुंबई सेंट्रल येथे ३ हजार ४०० रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. दादर येथे २ हजार रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली; येथे एका प्रवाशाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ३१५ प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली; येथे ३ प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. वांद्रे टर्मिनस येथे २ हजार ४७ रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली; येथे ५ प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. बोरीवली येथे ९३८ रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली; येथे १ प्रवाशाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण ९ हजार ७७९ रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि १० प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.जे प्रवासी पॉझिटिव्ह आढळतील किंवा चाचणी केलेले नसतील त्यांना कोविड केअर सेंटरला पाठविले जाईल. सर्व उपचारांवर प्रवाशांना स्वतः खर्च करावा लागेल.