गणेशोत्सवानंतर चाचण्या वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:07 AM2021-09-23T04:07:53+5:302021-09-23T04:07:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सप्टेंबरच्या सुरुवातीला शहर उपनगरांतील कोरोना चाचण्यांचे प्रमाण ३० हजारांच्या टप्प्यात होते. मात्र, गौरी-गणपती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सप्टेंबरच्या सुरुवातीला शहर उपनगरांतील कोरोना चाचण्यांचे प्रमाण ३० हजारांच्या टप्प्यात होते. मात्र, गौरी-गणपती विसर्जनानंतर कोरोना चाचण्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या १५ दिवसांत मुंबईत साडेपाच लाखांहून अधिक कोरोना चाचण्या कऱण्यात आल्या असून १४ सप्टेंबरनंतर दैनंदिन चाचण्यांचे प्रमाण ४० ते ४४ हजारांत पोहोचले आहे. प्रवास करुन मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांच्या माध्यमातून संसर्ग वाढू नये, यासाठी खबरदारी म्हणून पालिकेने कोरोना चाचण्यांना गती दिली आहे.
एकीकडे लसीकरण वेगाने होत असले, तरीही रुग्णसंख्या नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मुंबईमध्ये कोरोना चाचण्यांना सुरुवात करण्यात आली आहे. गौरी-गणपतीच्या सणासाठी मुंबईबाहेर गेलेले भाविक आता मुंबईत परतत आहेत. परतणाऱ्या मुंबईकरांनी कोरोना चाचण्या करून घ्याव्यात, या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. बसस्टँड, रेल्वे स्थानके, उद्याने तसेच सार्वजनिक ठिकाणी या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अँटिजन आणि आरटीपीसीआर या कोरोना चाचण्यांमध्ये मुंबई पालिकेने २१ सप्टेंबरला १ कोटी १८ हजार ७७० चा टप्पा पार केला. कोरोनाला रोखण्यात या चाचण्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून रुग्णांवर जलद उपचार करणे शक्य झाल्यामुळे संसर्ग नियंत्रणात आणणे शक्य झाले आहे. महापालिकेने ३ फेब्रुवारी २०२० पासून आरटीपीसीआर चाचण्या सुरू केल्या. त्याहीपेक्षा वेगवान अशा अँटिजन चाचण्या जुलै २०२० पासून जलद निदानासाठी वापरण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी चाचणी हा पहिला टप्पा आहे, त्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वतीने २६६ ठिकाणी मोफत चाचण्या सुरू कऱण्यात येतात.
चौकट
सर्वेक्षणासाठी स्वयंसेवकांचे पथक
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला संसर्ग नियंत्रणात असल्याने चाचण्या कमी होत्या, मात्र खरेदी, प्रवासानिमित्ताने अनेक जण बाहेर पडल्याने कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली. त्यानंतर आता बाहेरगावाहून मुंबईत आलेल्या लोकांच्या सर्वेक्षणासाठी स्वयंसेवकांचे पथक तैनात करण्यात आले आहे शिवाय गृहसंकुलांशी संपर्क करून बाहेरगावावरून आलेल्या लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा लोकांचा शोध घेऊन ‘अर्ली टेस्ट, ट्रिटमेंट ॲन्ड डिस्चार्ज’ या त्रिसूत्रीनुसार लक्षणे दिसण्यापूर्वीच चाचण्या करण्यावर भर देण्यात आल्याची माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
२१ सप्टेंबर २४९०७
२० सप्टेंबर ३१८६०
१९ सप्टेंबर ३६०४८
१८ सप्टेंबर ४१०२४
१७ सप्टेंबर ४०४४३
१६ सप्टेंबर ४४६४९
१५ सप्टेंबर २९८८६
१४ सप्टेंबर २८४९८
१३ सप्टेंबर २५५८१
१२ सप्टेंबर २९८४९
११ सप्टेंबर ३५८५१
१० सप्टेंबर ४९९२१
०९ सप्टेंबर ४८७१२
०८ सप्टेंबर ४८५२१
०७ सप्टेंबर ३८४८४
एकूण ५ लाख ५४ हजार २३४