मुंबई – महापालिकेने बाधित कोविड रुग्णांचा शोध घेण्यासाठी चाचण्या आणि संपर्कातील लोकांचा शोध घेताना १५ ऐवजी २० माणसे एवढे प्रमाण गृहीत धरण्याचे निर्देश दिल्यानंतर चाचण्यांचे प्रमाण आता वाढवण्यात आले आहे. मागील दोन दिवसांमध्ये पन्नास हजार पार कोविड चाचण्यांची संख्या करण्यात आल्यानंतरही रुग्णांचा आकडा दोनशे ते तीनशेच्या आतच सीमित राहिलेला पाहायला मिळत आहे. कोविड चाचण्या वाढल्यानंतरही रुग्णसंख्या वाढलेली नसल्याने मुंबईकर अजून तरी सुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.
आजवर सरासरी २६ ते ३० हजार एवढ्या कोविड चाचण्या करण्यात येत असताना १८ ऑगस्ट रोजी ३८ हजार ७०३ एवढ्या चाचण्या केल्या. त्यात २८३ रुग्ण आढळून आले. त्यानंतर १९ व २० ऑगस्ट रोजी अनुक्रमे ५२ हजार ४५२ व ५६ हजार ५६६ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये अनुक्रमे २८३ व ३२२ नवीन रुग्ण आढळून आले. २३ आगस्ट रोजी २४ हजार ८२८ चाचण्या, तर २२ आगस्टला ३२ हजार ६१६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चाचण्या वाढल्यानंतरही रुग्णांची संख्या वाढलेली नसल्याने एकप्रकारे मुंबईकरांसाठी हे सुचिन्ह असल्याचे बोलले जात आहे.
मुंबईत सध्या २ हजार ८०१ रुग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत शहर उपनगरात ८९ लाख ४७ हजार ३३२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. पालिकेने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविड विषयक वैद्यकीय प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोविड चाचण्यांची संख्या अधिकाधिक वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वैद्यकीय उपचारात ‘आरटीपीसीआर’ आणि ‘रॅपिड अँटिजेन’ या दोन्ही प्रकारच्या कोविड चाचण्यांचा समावेश करण्यात यावा. तसेच आवश्यक ‘किट’ उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रांमधील बाधित रुग्ण आणि संशयित रुग्ण यांच्या स्तरावर अधिकाधिक प्रभावी व सातत्यपूर्ण पाठपुरावा नियमितपणे करण्याच आदेश देण्यात आले आहेत.