Join us  

सिडकोच्या स्मार्ट सिटी प्रदर्शनाकडे पाठ

By admin | Published: December 07, 2015 12:54 AM

साऊथ नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी कशी असेल, याविषयीचे प्रदर्शन सिडकोेने वाशीत भरविले आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड झालेल्या

नवी मुंबई : साऊथ नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी कशी असेल, याविषयीचे प्रदर्शन सिडकोेने वाशीत भरविले आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड झालेल्या ९८ शहरांच्या प्रतिनिधींना आमंत्रण पाठविण्यात आले होते. परंतु दोन दिवसांत फक्त २० प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शविली असून, तब्बल ७८ प्रतिनिधींनी प्रदर्शनाकडे पाठ फिरविली आहे. खारघर ते पनवेलपर्यंत सिडको हा प्रकल्प उभा करणार आहे. या प्रकल्पामध्ये काय असणार, कोणते प्रकल्प उभे केले जाणार याची माहिती देणारे प्रदर्शन वाशीतील प्रदर्शनी हॉलमध्ये भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी देशातील ९८ शहरांच्या आयुक्तांना आमंत्रित करण्यात आले होते; परंतु या आमंत्रणाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. २० शहरांच्या प्रतिनिधींनी प्रदर्शनाला भेट दिली, परंतु त्यामध्ये एकाही आयुक्तांचा समावेश आहे. उर्वरित शहरांच्या आयुक्तांनी किंवा इतर प्रतिनिधींनीही हजेरी लावलेली नाही. यामुळे सिडकोच्या स्मार्ट सिटी संकल्पनेकडे संबंधित शहरांनी गांभीर्याने घेतले नसल्याची चर्चा सुरू झाली असून, हे आयोजकांचे अपयश असल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रदर्शनासाठी शालेय विद्यार्थी, बांधकाम व्यावसायिक व नागरिकांनी मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत जवळपास चार हजार जणांनी प्रदर्शनास भेट दिली आहे. सिडकोने आतापर्यंत उभारलेल्या व भविष्यातील प्रकल्पांची माहिती प्रदर्शनामध्ये देण्यात येत आहे. सिडकोचा गृहप्रकल्प, नवीन पालघर शहर, मरिना व कोस्टल रोड, बेलापूर किल्ल्याचा विकास कसा होणार, हे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत होते. अनेक नागरिकांनी प्रकल्पाचे कौतुक केले आहे. परंतु साऊथ नवी मुंबईऐवजी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील प्रकल्पांचाही यामध्ये समावेश असल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. स्टॉल्स उभरण्यासाठी व प्रदर्शन आकर्षक होण्यासाठीच सीबीडी व तुर्भे रेल्वे स्टेशन, बेलापूर किल्ला व इतर प्रकल्प ठेवले असल्याचे मत काहींनी व्यक्त केले. सिडको प्रशासनाने स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी प्रदर्शन मांडल्याची टीकाही अनेक लोकप्रतिनिधींनी केली आहे. स्मार्ट सिटीमध्ये मूळ गावठाणांच्या विकासासाठी फारशा योजना नसल्याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)