मुंबई - केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग खात्यांतर्गत असलेल्या कार्यालयांपैकी एक कार्यालय मुंबईतील विठ्ठल दास, ठाकरसी मार्ग याठिकाणी आहे. मात्र, आता हे कार्यालय दिल्लीला हलवण्यात येत असल्याचे सांगत विरोधकांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विट करत प्रश्न विचारला आहे. विशेष म्हणजे विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय.
मुंबईतले टेक्सटाईल आयुक्तांचे कार्यालय आता दिल्लीला हलवण्यात येत असल्याचे समजते. केंद्र सरकारने तसे वस्त्रोद्योग आयुक्तांना निर्देश दिलेत. ऐन विधिमंडळ अधिवेशन काळातच हा निर्णय झाल्यामुळे त्याचे पडसाद विधानसभेतही पाहायला मिळाले. मुंबईत सन १९४३ साली हे कार्यालय स्थापन करण्यात आले होते, आता, हे कार्यालय दिल्लीला हलवण्यात येत आहे. मुंबईतील सगळेच मुख्य युनिट, कार्यालय दिल्लीला जात आहेत, असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन सरकारला सवाल केला आहे. याप्रकरणी, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खुलासा केला.
वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही. केवळ वस्त्रोद्योग आयुक्त आणि 5 अधिकाऱ्यांना दिल्लीला येण्यास सांगितले आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाची फेरबांधणी आणि या क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. या आयुक्तालयात 500 अधिकारी-कर्मचारी आहेत. त्यामुळे संपूर्ण आयुक्तालय दिल्लीत हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, हे चुकीचे आहे, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलंय.
काँग्रेसच्या सचिन सावंत यांचेही ट्विट
महाराष्ट्राबद्दलचा पूर्वापार असलेला आकस मोदी सरकार आल्यापासून कृतीत उतरला आहे. IFSCसहित अनेक महत्त्वाचे उद्योग/ प्रकल्प, राष्ट्रीय संस्थांची महत्त्वाची कार्यालये गुजरात वा इतरत्र नेण्यात आली. आता 1943 पासून मुंबईत असणारे वस्त्र आयुक्त कार्यालय दिल्लीला हलवण्यात येत आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. मात्र, आता यावर फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंय.