ठाणे : येथील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्येप्रकरणी चारही नगरसेवक आज पोलिसांना शरण आले. त्यातील दोघांना प्रकृतीबाबत प्रतिकूल अहवाल आल्याने मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर उर्वरित दोघांना १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. शरण आलेल्या चार नगरसेवकांपैकी विक्रांत चव्हाण आणि नजीब मुल्ला यांना ठाणे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे यांनी १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, वैद्यकीय तपासात सुधाकर चव्हाण आणि हणमंत जगदाळे यांच्या प्रकृतीबाबत जिल्हा शासकीय डॉक्टरांनी जे.जे. रुग्णालयात तपासणीचा शेरा मारल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीचा अहवाल आल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या चारही नगरसेवकांचे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना उच्च न्यायालयाने शनिवारी पोलिसांसमोर शरण येण्यास सांगितले होते. त्यानुसार, चौघेही सकाळी कापूरबावडी सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात शरण आले. दुपारी दीडच्या सुमारास त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आणि ३च्या दरम्यान त्यांना न्यायालयात आणण्यात आले. सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण आणि हणमंत जगदाळे यांच्या प्रकृतीची तपासणी करण्याबाबत डॉक्टरांनी सल्ला दिल्याने पोलीस उपायुक्त (वागळे इस्टेट) व्ही.बी. चंदनशिवे हे त्यांना जे.जे. रुग्णालयात घेऊन गेले. विक्रांत चव्हाण यांची शासकीय रुग्णालयात तपासणी झाली. संध्याकाळी पावणेसहा वाजता सरकारी वकील राजा ठाकरे पुन्हा न्यायालयात आल्यावर नजीब मुल्ला आणि विक्रांत चव्हाण या दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी परमारच्या प्राप्तिकर तपासणीतील दुसऱ्या डायरीत राजकीय नेत्यांना १९ कोटी रुपये वाटल्याची माहिती न्यायालयाला दिली. परमार प्रकरणाशी संबंधित ही आर्थिक माहिती पुढे आल्याने अधिक माहिती मिळवण्यासाठी त्या दोघांना पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयासमोर केली. (प्रतिनिधी)समर्थकांची न्यायालयात मोठी गर्दी शरणागती पत्करणार म्हणून चारही नगरसेवकांच्या समर्थकांनी सहायक आयुक्त कार्यालय परिसर आणि न्यायालयात गर्दी केली होती. पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीशांनी सुनावल्यानंतर त्यांना नेणाऱ्या पोलिसांच्या गाडीला समर्थकांनी गराडा घातला होता. आव्हाडांची हजेरी : या चारही नगरसेवकांना न्यायालयात आणल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हे न्यायालयात आले. पाच मिनिटांत नगरसेवकांची भेट घेऊन त्यांनी काढता पाय घेतला. त्यांच्यासोबत आलेली त्यांची पत्नी ऋता आव्हाड या मात्र न्यायाधीशांचा निकाल येईपर्यंत हजर होत्या. मनसे आणि काँग्रेसचे काही स्थानिक नेतेही या वेळी उपस्थित होते.राबोडीतील ८० टक्के दुकाने बंदनजीब मुल्ला पोलिसांसमोर शरण येणार असल्याने राबोडीतील त्यांच्या समर्थक दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली होती. या घटनेचा फायदा घेऊ नये म्हणून १० ते १२ जणांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.पोलिसांना शरण येताना फक्त विक्रांत चव्हाण यांच्या हाती जेजुरीच्या जय मल्हार भंडाऱ्याच्या पिशवीत देवाचे पुस्तक होते. तसेच काही वैद्यकीय तपासणी अहवाल होते.
ठाण्याचे ‘ते’ चारही नगरसेवक शरण
By admin | Published: December 06, 2015 3:35 AM