मुंबई : के. टी. थापा गँगचा शूटर गुजरातमध्ये समाजसेवक बनल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून उघड झाली. अनिल गवांडे (५३) असे आरोपीचे नाव असून, त्याला गुजरातमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तब्बल २२ वर्षांनी तो गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे.भांडुपचा रहिवासी गवांडे हा गँगस्टर ते सेनेचे नगरसेवक असा प्रवास केलेल्या के. टी. थापाचा शूटर म्हणून काम करायचा. मुलुंड, कांजूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. १९९६ मध्ये तो जामिनावर बाहेर आला. तेथून त्याने थेट पत्नीसह गुजरात गाठले.वलसाड जिल्ह्यातील उमरगाव येथे त्याने प्रकाश नावाने स्वत:चे बस्तान बसविले. तेथे टिश्यू पेपर बनविण्याच्या कंपनीत तो नोकरी करू लागला. खेड्यातील नागरिकांना नोकरी देण्याच्या बहाण्याने तो काम करू लागला. हळूहळू सर्वांच्या नजरेत तो समाजसेवक बनला. पत्नी आणि दोन मुलांसोबत तो येथे राहायला होता. त्याच्यापर्यंत पोहोचणे गुन्हे शाखेसमोर आव्हान होते.काही दिवसांपूर्वी त्याच्याबाबत तुटकशी माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ला मिळाली. कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर, पोलीस उपनिरीक्षक अशोक चव्हाण, अंमलदार रोहिदास हासे, विनोद राणे, राजेंद्र निकाळे, राजाराम कदम यांचे पथक गुजरातला रवाना झाले. तेथे त्यांनी १५ दिवस त्याच्यावर पाळत ठेवली. अखेर ६ आॅगस्टला तो जाळ्यात अडकला.
थापा गँगचा शुटर बनला समाजसेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 5:00 AM