‘उत्तर भारतीय मतांसाठीच ठाकरे बंधूंचे राजकारण’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:58 AM2018-12-04T05:58:52+5:302018-12-04T05:58:58+5:30
मतांच्या राजकारणासाठीच ठाकरे बंधू उत्तर भारतीयांशी संवाद साधत आहेत.
मुंबई : मतांच्या राजकारणासाठीच ठाकरे बंधू उत्तर भारतीयांशी संवाद साधत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. त्यातच मुंबईतील मराठी टक्का घसरल्यामुळे आता उत्तर भारतीयांची मते मिळावीत यासाठीच शिवसेना आणि मनसेची धडपड सुरू असल्याची टीका सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निशाणा साधला. मुंबईतला मराठी टक्का कमी झाला आहे. मराठीचा आग्रह धरणाऱ्या शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी मुंबईतील लोकांना स्थिरता मिळावी यासाठी काहीच केले नाही. त्यामुळेच आता उत्तर भारतीयांची मते मिळविण्यासाठी ठाकरे बंधू सरसावले आहेत.
उद्धव ठाकरे यांचे शरयू नदीच्या काठावर जाणे निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच होते. त्यानंतर राज ठाकरे हिंदी भाषिकांसमोर जात हिंदीत भाषण करतात हीसुद्धा निवडणुकांचीच तयारी आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.