Join us

अमितच्या लग्नानंतर राज ठाकरेंनी केलं 'कन्यादान', मनसैनिकांच्या आनंदाला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 6:19 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. फॅशन डिझायनर मिताली बोरूडे हिच्याशी अमित यांनी लग्नाची गाठ बांधली.

मुंबई - राजपुत्र अमित याच्या लग्नानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 500 गरीब आणि आदिवासी मुलींचे लग्न लावले. पालघर येथे मनसेच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्याला राज यांनी केवळ हजेरीच लावली नाही. तर, चक्क कन्यादानही केलं. नुकतंच माझा मुलगा अमितचं लग्न झालं, ह्या सोहळ्या इतकंच समाधान आणि आनंद आज अजून एका सोहळ्याने दिला, असे म्हणत राज यांनी पालघर येथील लग्नसोहळ्यातील आयोजकांच कौतुक केलं आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. फॅशन डिझायनर मिताली बोरूडे हिच्याशी अमित यांनी लग्नाची गाठ बांधली. ठाकरे कुटुंबीयांच्या या लग्नसोहळ्याला दिग्गज नेत्यांनी गर्दी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंकजा मुंडे, यांसह बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेतेही येथे हजर होते. आता, अमितच्या लग्नानंतरही राज यांच्या घरी लगीनघाई होती. कारण, राज ठाकरे 500 आदिवासी मुला-मुलींच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार होते. त्यानुसार पालघर येथील मनसैनिकांनी आयोजित केलेला लग्नसोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. 

पालघर जिल्ह्यातील गरीब, शेतकरी, मजूर आणि आदिवासी भागातील 500 जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरेंसह हजेरी लावली. अमितच्या लग्नाइतकाच आनंद या लग्नसोहळ्याने मला झाल्याचे राज यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे. तर, या सोहळ्यास केवळ उपस्थित राहून अक्षदाच टाकल्या नाहीत, तर राज यांनी कन्यदान करून वडिलांची भूमिका बजावली. तसेच वधु-वरांना आशिर्वादही दिले. बोईसर येथील खैरपाडा मैदानात हा विवाहसोहळा संपन्न झाला. पालघर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, राजपुत्र अमित ठाकरेंचा विवाहसोहळ 27 जानेवारी रोजी मोठ्या दिमाखात पार पडला. या विवाहसोहळ्याची राज्यभर चर्चा रंगली होती.  

 

 

टॅग्स :राज ठाकरेमनसेलग्नपालघर