मुंबई- निवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.
'माझी मागणी १३० कोटी भारतीयांची भावना'; केजरीवालांचे PM मोदींना पत्र
भाजपाचे आमदार राम कदम यांनीही एक फोटो ट्विट केला असून त्यामध्ये ४ नोटांचे फोटो आहेत. एका फोटोवर छत्रपती शिवाजी महाराज, दुसऱ्या फोटोवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तिसऱ्या फोटोवर विनायक सावरकर, तर चौथ्या फोटोवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. राम कदम यांच्या या ट्विटची चर्चा रंगू लागली आहे.
राम कदम यांच्या या ट्विटवर ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला आहे. राम कदम विद्वान आहेत. नशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही. पृथ्वीचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा, असं म्हणत अंधभक्ती किती असावी, याचं हे उदाहरण आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
दरम्यान, भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधीजींसोबतच श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीचा फोटो छापा, अशी अफलातून मागणी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केली. ही मागणी म्हणजे गुजरात निवडणुकीसाठी केजरीवाल यांनी हिंदुत्वाचे कार्ड खेळल्याचे मानले जात आहे. 'लक्ष्मीला समृद्धीची देवी मानले जाते, तर गणपती विघ्नहर्ता आहे. आम्ही सर्व नोटा बदला असे सांगत नाही. किमान नवीन नोटांवर ही सुरुवात तर भारतीय अर्थव्यवस्था रूळावर केली जाऊ शकते, असे केजरीवाल म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"