मुंबई – एकीकडे राज्यावर कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे राज्यातलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली, या भेटीनंतर राज्यात नेमक्या काय मोठ्या घडामोडी घडत आहेत? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी भाजपा खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांना भेटून केली. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली. मंगळवारी संध्याकाळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत. राज्यात पडद्यामागून हालचाली सुरु आहेत का? अशी शंका राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला कानपिचक्या दिल्या आहेत.
संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितले की, सरकार अस्थिर करण्याचा आनंद ज्यांना घ्यायचं आहे त्यांना घेऊ द्या, वेळ घालवण्यासाठी काही खेळ विरोधी पक्षाला करायचे असतील करु द्या, त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत. राज्यातील ठाकरे सरकार, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचं सरकार पुढील ५ वर्ष कायम राहील त्यानंतर होणाऱ्या निवडणुकाही एकत्र होईल. शरद पवार मातोश्रीवर आले, त्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही चर्चा झाली असेल तर त्यात वावगं वाटण्याचं कारण नाही, शरद पवारांचं मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदीही घेत असतात असं ते म्हणाले.
तर महाविकास आघाडी सरकारचे शरद पवार हे शिल्पकार आहेत. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून मार्गदर्शन केले आहे. उद्धव ठाकरे यांना १७० आमदारांचे पाठबळ आहे. शरद पवार हे उत्तम प्रशासक आणि संघटक आहेत, तो मातोश्रीवर आले त्यात काही हरकत नाही, शरद पवार हे मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. मीडियात आलेल्या बातम्यांमुळे सरकारला कुठेही धोका नाही. हे सरकार मजबूत आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरणाऱ्या राज्यांवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं भाजपाचं मत असेल तर पहिल्यांदा गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी लागेल. त्याठिकाणी अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारे लावले आहेत असं सांगत संजय राऊतांनी भाजपावर आगपाखड केली.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सगळ्या पक्षांचे नेते संपर्कात आहेत. गेल्या ४ बैठकीत काँग्रेसचे नेतेही सोबत आहे. महाविकास आघाडीत काही घटना घडत असतात अशावेळी शरद पवार तात्काळ उपलब्ध असतात. काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात असतात. पुढच्या ५ वर्षात सरकारला अजिबात धोका नाही, महाराष्ट्रातला विरोधी पक्ष टिकायला हवा. त्यांनी आपल्या पक्षाची काळजी घ्यावी हा इशारा आहे. चर्चा काहीही असू शकता, विरोधी पक्षाचे ५० आमदार महाविकास आघाडीत सामील होणार अशीही चर्चा आहे. प्रत्येक चर्चा खऱ्या नसतात. २०२५ ची निवडणुकही महाविकास आघाडी एकत्र लढेल. ज्या अपक्ष आमदारांनी विरोधी पक्षाला पाठिंबा दिला तेही विचलित झाले आहेत. यातील आमदार काही संपर्कात आहेत असं सांगत संजय राऊतांनी भाजपाला इशारा दिला आहे.