Join us

वाईन उत्पादकांना सवलत देणारे ठाकरे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन : अतुल भातखळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 4:06 AM

मुंबई : दुष्काळ, अतिवृष्टीसह बोंडअळी आणि आता गारपिटीमुळे त्रस्त शेतकऱ्यांना राज्यातील ठाकरे सरकारने कोणतीच मदत केली नाही. तर, दुसरीकडे ...

मुंबई : दुष्काळ, अतिवृष्टीसह बोंडअळी आणि आता गारपिटीमुळे त्रस्त शेतकऱ्यांना राज्यातील ठाकरे सरकारने कोणतीच मदत केली नाही. तर, दुसरीकडे प्रोत्साहनाच्या नावाखाली वाईन उत्पादकांना तब्बल चाळीस कोटी रुपयांची उधळण केली आहे. त्यामुळे ''वाईन उत्पादकांच्या बाबतीत उदार पण शेतकऱ्यांच्या बाबतीत गद्दार'' असे हे ठाकरे सरकार असल्याची टीका मुंबई भाजप प्रभारी, आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याचे कारण पुढे करून मागील वर्षभरात शेतकऱ्यांना व शेती संलग्न व्यवसायांना एका नव्या रुपयाची सुद्धा मदत सरकारने केली नाही. पण आता अर्थपूर्ण संवाद साधत काही विशिष्ट लोकांची मर्जी सांभाळण्याचे काम केले आहे. मे ते जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी त्यामुळे दुबार - तिबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली. तर, काही भागात कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागले. शिवाय कापसावर आलेली बोंडअळी, तुरीला लागलेली कीड यानंतर आता मागील आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर प्रचंड आर्थिक संकट ओढवले आहे. मागील पंधरा महिन्यांत साडेचार हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशा परिस्थितीत ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची आवश्यकता होती. परंतु प्रत्येक वेळी सरकारकडे पैसे नसल्याचे कारण पुढे करत ही मागणी फेटाळली.

शेतकऱ्यांना मदत नाकारणाऱ्या ठाकरे सरकारने आधी दारू विक्रेत्यांच्या वार्षिक फी व करात सवलत दिली. आता तर दारू व वाईन उत्पादनातून करोडो रुपये कमावणाऱ्या वाईन उत्पादकांना २०१७ पासूनची प्रोत्साहनपर थकबाकी म्हणून चाळीस कोटी रुपयांची मदत केली. यातून या सरकारची शेतकऱ्यांबद्दलची मानसिकता लक्षात येते, त्यामुळे आगामी काळात ठाकरे सरकारला याची किंमत नक्कीच मोजावी लागेल, असा इशारासुद्धा भातखळकर यांनी दिला.