ठाकरे सरकारला आता ‘हिंदू’ शब्दाचेसुद्धा वावडे - आ. अतुल भातखळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:15 AM2020-12-04T04:15:13+5:302020-12-04T04:15:13+5:30
मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारला आता हिंदू शब्दाचेही वावडे असल्याचा आरोप मुंबई भाजप प्रभारी, आमदार अतुल भातखळकर यांनी केला ...
मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारला आता हिंदू शब्दाचेही वावडे असल्याचा आरोप मुंबई भाजप प्रभारी, आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा फॉर्ममध्ये धर्माच्या रकान्यातून हिंदू शब्द वगळून अल्पसंख्याकेत्तर (नॉन-मायनॉरिटी) असा उल्लेख केला आहे. मंदिरे सुरू करण्यासाठी तब्बल सहा महिने उशीर करणे, आषाढी वारीसाठी दिलेल्या बससाठी भाडे आकारणे, हिंदूंच्या साधूंचे हत्याकांड होऊनही आरोपींच्या विरोधात कडक कारवाई न करणे आणि आता चक्क हिंदू शब्दच वगळणे यातून ठाकरे सरकार ‘काहींना’ खूश करण्यासाठी आणि आपली मतपेटी सांभाळण्यासाठी सतत हिंदूविरोधी निर्णय घेत आहे, असा आरोपही अतुल भातखळकर यांनी केला आहे. या प्रकरणी भातखळकर यांनी मुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. २४ तासांत हा फॉर्म मागे घेऊन त्यात हिंदू धर्माचा उल्लेख न केल्यास भाजप तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.