मविआ सरकार राज ठाकरेंना तुरुंगात डांबेल; भाजपच्या बड्या नेत्याचं ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 11:07 PM2022-05-03T23:07:04+5:302022-05-03T23:11:12+5:30
भोंगे असलेल्या मशिदींसमोर उद्यापासून हनुमान चालिसा दावा; राज ठाकरेंचा आक्रमक पवित्रा
मुंबई: तुम्ही धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. उद्या ज्या ज्या मशिदींच्या भोंग्यांमधून अजान, बांग ऐकू येईल, त्या त्या मशिदींसमोर हनुमान चालिसा लावा. भोंग्यांमुळे काय त्रास होतो, ते त्यांनाही कळू दे, अशा शब्दांत राज यांनी इशारा दिला आहे. राज ठाकरे राज्य सरकारला लक्ष्य करत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
हनुमान चालिसा वाचणं राजद्रोह ठरवणारं मविआ सरकार खासदार-आमदार दाम्पत्याला तुरुंगात डांबण्यासाठी जंग-जंग पछाडतंय. काहीही करून हिंदुत्वाची मुस्कटदाबी करायचीच, हाच या सरकारचा अजेंडा आहे. या परिस्थितीत कोर्टानं आदेश दिलेले भोंगे काढा म्हणणाऱ्या राज ठाकरेंबाबतही वेगळं काय होणार?, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
हनुमान चालिसा वाचणं राजद्रोह ठरवणारं मविआ सरकार खासदार-आमदार दाम्पत्याला तुरुंगात डांबण्यासाठी जंग-जंग पछाडतंय. काहीही करून हिंदुत्वाची मुस्कटदाबी करायचीच, हाच या सरकारचा अजेंडा आहे. या परिस्थितीत कोर्टानं आदेश दिलेले भोंगे काढा म्हणणाऱ्या राज ठाकरेंबाबतही वेगळं काय होणार? 1/2
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 3, 2022
बेकायदा भोंग्याच्या आवाजानं होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आक्षेप असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय. हे भोंगे काढण्याचे आदेश न्यायालयानेही दिलेत. प्रसंगी न्यायालयाचा अवमान करू, पण हिंदुत्वाची मुस्कटदाबी करूच, अशी भूमिका मविआ सरकार घेईल आणि राज ठाकरेंनाही निश्चितच तुरुंगात डांबेल, असं पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
एकदाचा फैसला होऊन जाऊ दे- राज ठाकरे
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत" हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे, असं म्हणत राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडलं आहे.
देशात इतकी कारागृहं नाहीत की...
देशात इतकी कारागृहं नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबणे सरकारला शक्य होईल! हेसुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावे. माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारून एकत्र या. आता नाही, तर कधीच नाही, असं राज यांनी पत्रात म्हटलं आहे.