ठाकरे सरकारची दादागिरी जास्त दिवस चालणार नाही - किरीट सोमय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:06 AM2021-09-21T04:06:48+5:302021-09-21T04:06:48+5:30
मुंबई : प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यास मनाई केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या सोमवारी मुंबईत परतले. या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी ...
मुंबई : प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यास मनाई केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या सोमवारी मुंबईत परतले. या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी सोमय्या यांचे जंगी स्वागत करीत त्यांचा जयजयकार केला. दरम्यान, सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यावरही या वेळी निशाणा साधला.
मुंबईत येताच किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना कोल्हापूर जिल्हाबंदी तसेच महाविकास आघाडी सरकारच्या घोटाळ्यांवर भाष्य केले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ घोटाळेबाज असून, त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यंत्री अजित पवार पाठीशी घालत आहेत. मी लढत असलेली लढाई एक प्रकारची क्रांती आहे. मी आता शांत बसणार नाही. माझी लढाई घोटाळेबाजांविरोधात आहे. मी यांचे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे सरकारची दादागिरी सुरू आहे. पण, ही दादागिरी जास्त दिवस चालणार नाही. पवार आणि ठाकरेंचे मुश्रीफांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करावीच लागणार, असे सोमय्या म्हणाले.
येत्या रविवारी अलिबागचा दौरा करणार असल्याचे सोमय्या यांनी या वेळी जाहीर केले. अलिबागला मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने १९ बंगल्यांचा घोटाळा केला आहे. याच बंगल्यांची मी अलिबागला जाऊन पाहणी करणार आहे. तसेच येत्या गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यात जाणार आहे. पारनेरमध्ये साखर कारखान्यामध्ये जो घोटाळा झाला आहे, त्याची पाहणी करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानांचाही सोमय्या यांनी समाचार घेतला. संजय राऊत यांनी काल किरीट सोमय्या यांच्यासोबत जे झाले, त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही, असे म्हटले आहे. हे तेच राऊत आहेत ज्यांनी बीएमएसी बँकेच्या डिपॉझिटरचे ५५ लाख रुपये ढापले होते. हाच चोरीचा माल त्यांना परत करावा लागला होता, असे ते म्हणाले.