Join us

“वर्धापन दिन नाही, ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करावा”; आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 12:23 IST

Aaditya Thackeray News: सगळीकडून ‘रिजेक्ट’ झालेला माल आमचा वर्धापन दिन कसा काय साजरा करू शकतो, असा खोचक सवाल आदित्य ठाकरेंनी लगावला.

Aaditya Thackeray News: शिवसेनेचे वर्धापन दिन शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून साजरा केला जात आहे. मात्र, वर्धापनदिनाच्या आधीच ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मनीषा कायंदे आणि शिशिर शिंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्याची माहिती मिळाली आहे. पैकी मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर टीकास्त्र सोडले.

वरळीत ठाकरे गटाचे राज्यव्यापी शिबीर आहे. या शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या शिबिराला राज्यभरातून अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी दाखल होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे कामाची पाहणी करण्यासाठी वरळीत आले होते. दोन्ही गटाकडून वर्धापन दिनाच्या सुरू असलेल्या तयारीबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला.

वर्धापन दिन साजरा करण्यापेक्षा ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करावा

वर्धापन दिन आम्हीच साजरा करणार आहोत. दुसरीकडे ज्यांची हकालपट्टी झाली आहे. सगळीकडून ‘रिजेक्ट’ झालेला माल आमचा वर्धापन दिन कसा काय साजरा करू शकतो. त्यांनी ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करावा. कारण जगातील ३३ देशांनी त्यांच्या गद्दारीची नोंद घेतली आहे. तोच दिवस त्यांनी साजरा करावा. त्यांनी किती निर्लज्जपणे गद्दारी केली, हे त्यांनी लोकांना दाखवून द्यावे, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले वाहिल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. वंचित आणि शिवसेनेच्या युतीवरून भाजपने थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. याबाबत आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. यावर, मला आत्ताच माध्यमांकडून ही माहिती कळते आहे. मला त्याची माहिती घेऊ द्या आणि मग मी त्यावर बोलेन, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :आदित्य ठाकरेआदित्य ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदे