वीज दरवाढविरोधात ठाकरे गट आक्रमक;  टाटा पावर कार्यालयावर शिवसेनेचा धडक मोर्चा

By मनोहर कुंभेजकर | Published: February 3, 2024 07:30 PM2024-02-03T19:30:05+5:302024-02-04T17:14:56+5:30

एप्रिल नंतर टाटा पॉवर कंपनी वीज दरवाढीचा घरगुती ग्राहकांना मोठा शॉक व भार देण्याच्या तयारीत

Thackeray group aggressive against electricity price hike; Shiv Sena strike at Tata Power office | वीज दरवाढविरोधात ठाकरे गट आक्रमक;  टाटा पावर कार्यालयावर शिवसेनेचा धडक मोर्चा

वीज दरवाढविरोधात ठाकरे गट आक्रमक;  टाटा पावर कार्यालयावर शिवसेनेचा धडक मोर्चा

मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे बोरिवली (पूर्व ) मागठाणे येथील टाटा पॉवर कार्यालयावर आज शिवसैनिकांचा मोर्चा धडकला, यावेळी  शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत टाटा पॅावर कंपनीचा ग्राहकांच्या वतीने निषेध नोंदवला.

टाटा कंपनीचा दि,1 एप्रिल पासूनचा वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक मंडळाने मंजूर केला. तर मुंबईतील छोट्या घरगुती ग्राहकांना जास्त भार सहन करावा लागणार आहे. दरमहा सुमारे 100-300 युनिट पर्यंत वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांची संख्या ही सर्वात जास्त आहे. त्यामुळे जास्तीत जास्त टाटाचे वीज ग्राहक या प्रस्तावाच्या अंमलबजावणीनंतर भरडले जातील. 1 ते 100 युनिट साठी जवळ 201 टक्के भाव वाढ प्रस्तावित आहे. 100 ते 300 युनिट पर्यंत जवळ 89 टक्के वाढ आहे व 300-500  युनिट साठी 10 वाढ प्रस्तावित आहे. ही दरवाढ राज्य विज आयोगाने मान्य केल्यास 1 एप्रिल पासून उन्हाळ्यात सर्वसामान्य ग्राहकांना शॉक बसणार आहे. सध्या 100 युनिटपर्यंत टाटा कडून 3 रुपये 45 पैसे घेतले जातात, मात्र आता 201 टक्के दरवाढ होणार आहे, असं आंदोलक, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी सांगितले. दरवाढी संदर्भात ग्राहकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान यांना ईमेल द्वारे देखील कळविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आल. गरिबांना या वीज दरवाढीचा फटका बसणार आहे, 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने  आज राज्य वीज नियामक मंडळाकडे पाठविलेला प्रस्ताव मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली. पूर्वी उपनगरात बी. एस. ई. एस. कंपनी वीज पुरवठा अल्प दरात करायची. बी. एस. ई. एस. कंपनी रिलायन्सने घेतली व आता अदानी वीज पुरवठा करते. या क्षेत्रात मक्तेदारी नसावी व स्पर्धा व्हावी व वीज पुरवठा स्वस्त व्हावा या हेतूने केंद्र सरकार व राज्य सरकारने मुंबई उपनगरात टाटा हि स्पर्धेत उतरली. टाटाने वीज स्वस्त देतो म्हणून ग्राहक खेचले, स्वतःचे नेटवर्क नसताना अदानीचे नेटवर्क वापरून काम सुरु केले व आता टाटा ग्राहकांना बाय बाय टाटा करते काय? अशी भीती ग्राहकांमध्ये आहे अशी माहिती घोसाळकर यांनी दिली. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान दरवाढीचा प्रस्ताव मागे न घेतल्यास पूर्व व पश्चिम उपनगरा जागेजागी तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

शिवसेना उपनेते, माजी आमदार डॉ.विनोद घोसाळकर  यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात उपनेत्या संजना  घाडी, आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर व महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे तसेच माजी नगरसेवक  बाळकृष्ण ब्रीद, संजय घाडी, योगेश भोईर, अभिषेक घोसाळकर, भास्कर खुरसंगे व माजी नगरसेविका माधुरी भोईर, संध्या दोशी, गीता सिंगण, रिद्धी खुरसंगे यांच्यासहित पुरुष,महिला व युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्राहक यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी वरिष्ठ अधिकारी उत्तर विभाग दिपक म्हसे यांना निवेदन सादर करण्यात आले.

टाटा पॉवरकडून स्पष्टीकरण 

"टाटा पॉवरमध्ये आम्ही निम्न स्तरातील आमच्या ग्राहकांसाठीच्या टॅरिफबद्दल नेहमीच संवेदनशील असतो. आमचे सध्याचे टॅरिफ महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी टॅरिफपैकी एक आहे. टॅरिफ संरचनेला तर्कसंगत बनवण्यासाठी सर्व निवासी विभागांमध्ये टॅरिफमध्ये थोडीशी वाढ करण्याचे आम्ही सुचवले आहे. पण हे फक्त प्रस्तावित टॅरिफ आहे आणि याबाबतचा अंतिम निर्णय माननीय महाराष्ट्र वीज नियामक आयोग घेईल, जो आमच्या ग्राहकांच्या हिताचा असेल", असे स्पष्टीकरण टाटा पॉवरकडून देण्यात आले आहे.

Web Title: Thackeray group aggressive against electricity price hike; Shiv Sena strike at Tata Power office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.