मुंबई : कल्याणमधील छत्रपती शिवाजी चौकात दहीहंडी उत्सव साजरा करण्यावरून उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटात वाद असताना उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला यंदाच्यावर्षी तडजोड करण्याचा सल्ला दिला. यंदा त्याग करा पुढच्यावर्षी फळ मिळेल. पुढच्यावर्षी पूर्ण तयारीने या, असे म्हणत न्यायालयाने ठाकरे गटाला छत्रपती शिवाजी चौकापासून १०० मीटर दूर असलेल्या कुबा रेस्टॉरंटजवळ दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी दिली.
कल्याण पोलिसांतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी छत्रपती शिवाजी चौकात दोन्ही गटांना परवानगी देणे शक्य नसल्याने न्या. सुनील शुक्रे व न्या. एफ. पुनिवाला यांच्या खंडपीठाला सांगितले. दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पथके व त्यांचे गोवंदा येतात. त्यामुळे एखादी दुर्घटना घडली तर त्याची काळजी घेणे शक्य होणार नाही. जर दोन्ही गटांना वेळेचे विभाजन करून दिले तरी कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होईल. त्यापेक्षा ठाकरे गटाला मुख्य चौकापासून १०० मीटर दूर असलेल्या कुबा रेस्टॉरंटजवळ जागा देणे शक्य आहे, असे साखरे यांनी न्यायालयाला सांगितले.
एका गटाला परवानगी आणि दुसऱ्या गटाला परवानगी का नाही? असा सवाल न्यायालयाने करताच साखरे यांनी म्हटले की, पहिल्यांदा आलेल्याला पहिली परवानगी दिली.अशा प्रकरणांत तुमचे हे तत्व चालणार नाही. यंदाच्या वर्षी चालवून घेऊ. पण पुढील वर्षी याबाबत ठोस धोरण आखा, अशी सूचना न्यायालयाने सरकारला केली.
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबद या शहरांची लोकसंख्या वाढत आहे. वाढीव एफएसआय याला जबाबदार आहे. मात्र, पायाभूत सुविधा वर्षानुवर्षे तसाच आहे. धरतीवरचा भार वाढत आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. पुढच्यावर्षी धोरण घेऊन या. दहीहंडीत गोविंदांची संख्या मर्यादित ठेवा. तसेच सण साजरा करण्यासाठी वेळ निश्चित करा. सणामुळे जनतेची गौरसोय होऊ देऊ नका. सार्वजनिक रस्त्यावर सण साजरे केले जात असल्याने वाहतूककोंडी होत आहे, असेही न्यायालय म्हणाले.