चंद्रहार पाटलांना ठाकरे गटाची सांगलीत उमेदवारी; पक्षप्रवेश करताच उद्धव ठाकरेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 06:24 AM2024-03-12T06:24:05+5:302024-03-12T06:24:40+5:30
सांगलीत काँग्रेसने विशाल पाटील यांच्या उमेदवारीचा आग्रह धरलेला असताना आज ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांचे नाव जाहीर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सोमवारी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. सांगलीच्या पहिलवानाला दिल्लीत पाठवा, असे आवाहन करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाटील यांची सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा केली.
ठाकरे यावेळी म्हणाले, की गद्दार आमचा पक्ष सोडून जात आहेत आणि मर्द, पैलवान आमच्याकडे येत आहेत. गदा हाती असलेल्या चंद्रहार यांच्या दुसऱ्या हातात आम्ही मशाल देत आहोत. आता ते सांगलीचे मैदान जिंकतील. मी त्यांच्या प्रचारासाठी जाईन आणि विजयी सभेसाठीदेखील जाणार आहे.
यावेळी खा. संजय राऊत आदी उपस्थित होते. पाटील यांच्या समर्थकांनी यावेळी ‘अब की बार चंद्रहार’ अशा घोषणा दिल्या. ‘मला बोलून दाखविण्यापेक्षा करून दाखवण्याची सवय आहे. लोकसभा निवडणुकीत सांगलीतून शिवसेनेला नक्की विजय मिळवून देऊ’ असे चंद्रहार पाटील म्हणाले आणि ठाकरे यांना त्यांनी गदा भेट दिली.
कीर्तिकरांनंतर पाटील
- उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीची घोषणा उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच केली होती.
- अमोल यांचे वडील गजानन कीर्तिकर हे या मतदारसंघाचे खासदार आहेत आणि ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत.
- महाविकास आघाडीत घोषणा न होताच ठाकरे यांनी परस्पर अमोल यांचे नाव जाहीर केल्याबद्दल माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
- सांगलीत काँग्रेसने विशाल पाटील यांच्या उमेदवारीचा आग्रह धरलेला असताना आज ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांचे नाव जाहीर केले.