अभ्यंकर मुंबई शिक्षकसाठी ठाकरे गटाचे उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 03:13 PM2024-03-06T15:13:32+5:302024-03-06T15:13:58+5:30
‘शिक्षक भारती’चे नेते जालिंदर सरोदे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मातोश्री येथे शिक्षक सेनेत प्रवेश केला. त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभ्यंकर यांच्या नावाची घोषणा केली.
मुंबई : विधानपरिषदेवरील मुंबईशिक्षक मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मंगळवारी माजी शिक्षण संचालक ज. मो. अभ्यंकर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. ‘शिक्षक भारती’चे नेते जालिंदर सरोदे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मातोश्री येथे शिक्षक सेनेत प्रवेश केला. त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभ्यंकर यांच्या नावाची घोषणा केली.
अभ्यंकर यांच्याकडे शिवसेनेच्या (ठाकरे गट) मुंबई शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक यंत्रणाप्रमुख म्हणून जबाबदारी होती. आघाडी सरकारच्या काळात राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अभ्यंकर यांनी सांभाळली होती. त्या आधी त्यांनी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्षपद भूषविले होते. तसेच शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. सरोदे यांच्या प्रवेशामुळे अभ्यंकर यांच्यामागील शिक्षकांचे पाठबळ वाढणार आहे.
शिक्षकांमुळे आपल्याला शिस्त लागते. सुसंस्कृतपणा शिकवला जातो. पण सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणात शिक्षकी पेशातून आता राजकारणाला सुसंस्कृतपणाचा धडा देण्याची गरज आहे.
- उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री
शिक्षकांना न्याय मिळवून देऊ
शिक्षक सेनेकडे आपले काहीसे दुर्लक्ष झाले होते. मात्र, अभ्यंकर आणि सरोदे यांच्या प्रवेशामुळे शिक्षकांमधील सेनेची ताकद वाढली आहे. शिक्षकांनी शिक्षणाचेच काम करावे. त्यांना अन्य कामे लावू नये, यासाठी शिक्षक सेना आग्रही राहील. आमची सत्ता आल्यानंतर शिक्षकांना न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.
पाटील यांना धक्का
शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या ‘शिक्षक भारती’चे नेते जालिंदर सरोदे यांनी संघटनेचे माजी पदाधिकारी प्रकाश शेळके, सलीम शेख, शशिकांत उतेकर, मच्छिंद्र खरात, आर. बी. पाटील यांच्यासमवेत शिक्षक सेनेत प्रवेश केला. सरोदे कपिल पाटील यांच्या विश्वासातील नेते मानले जात.