Uddhav Thackeray Live: “हे आपल्या राजकीय आयुष्यातील शेवटचे आव्हान, ते जिंकायचंच”; उद्धव ठाकरेंचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 09:57 PM2023-02-27T21:57:42+5:302023-02-27T21:58:43+5:30
Uddhav Thackeray Live: ठाकरे नाव वगळा. स्वतःच्या वडिलांचा फोटो, नाव लावा आणि या, मग बघू तुमचे काय होते ते, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिले.
Uddhav Thackeray Live: या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये जागरुक राहावे लागेल. अनेक जण मला सांगतात की, साहेब निवडणुका येऊ द्या. या सगळ्याची तयारी तुम्हाला करायची आहे. ही आपल्याला एक मोठी संधी आहे. हे आपल्या राजकीय आयुष्यातील शेवटचे आव्हान, ते जिंकायचेच आहे, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला.
मराठी भाषा दिवस आणि स्थानिय लोकाधिकार समिती सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप, केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ज्यांचा कधीही स्वातंत्र्याशी तिळमात्र संबंध नव्हता, ते आता स्वातंत्र्य मारायला निघालेत, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. जे मी सांगतोय ते सगळ्यांना पटायला लागले आहे. आता डोळे उघडले नाहीत, तर २०२४ ची निवडणूक देशातील शेवटची निवडणूक असेल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येऊन गेले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा फोन येऊन गेला. सगळे विरोधक एकत्र येऊ लागले आहेत, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
हे आपल्या राजकीय आयुष्यातील शेवटचे आव्हान
हे आपल्या राजकीय आयुष्यातील शेवटचे आव्हान आहे आणि हे आव्हान आपल्याला जिंकायचेच आहे. मोडायचे म्हणजे मोडायचेच आहे. हे आव्हान एकदा मोडून काढले की, देशात शिवसेनेला आव्हान देणारा कुणी शिल्लक राहिलेला नसेल. नड्डीही नसेल. नड्डा जे बोलले होते की भाजपशिवाय दुसरा पक्ष राहणार नाही. अहो नड्डाजी निवडणुकीला या, तुम्हीच शिल्लक राहणार नाही, ही आग तुम्ही आमच्या मनात पेटवलेली आहे, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले. लोकन्यायालयात लढाई होणार आहे, त्यासाठी तयार राहा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.
दूध का दूध और पानी का पानी आम्ही करणार
आई-वडिलांनी दिलेले संस्कार झाले नाहीत की दुसऱ्याची गोष्ट चोरण्याची वेळ येते, ती त्यांच्यावर आली. आपले शत्रू कोण हे सर्वांना माहिती आहे. दूध का दूध और पानी का पानी आम्ही करणार. केवळ एवढेच नाही, तर तुमचे गोमूत्र कसे आहे, तेही आम्ही दाखवणार आहोत, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. सर्वोच्च न्यायालय शेवटची आशा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केवळ शिवसेनेचा नाही, तर देशाच्या भविष्याचा असेल, असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले.
दरम्यान, तुमच्यात हिंमत असेल तर आव्हान देतो की, ठाकरे नाव वगळा आणि शिवसेना चालवून दाखवा. स्वतःच्या वडिलांचा फोटो लावून शिवसेना चालवून दाखवा. स्वतःच्या वडिलांचे नाव लावा आणि या, मग बघू तुमचे काय होते ते, असे खुले आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"