Join us

Uddhav Thackeray Live: “निवडणूक चुना लगाओ आयोग म्हणायला हवं, चोमडेपणा करायची गरज नव्हती”: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 9:32 PM

Uddhav Thackeray Live: सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केवळ शिवसेनेचा नाही, तर देशाच्या भविष्याचा असेल, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray Live: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि पक्ष चिन्ह याचा निकाल शिंदे गटाच्या बाजून दिला. त्याचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. मराठी भाषा दिवस आणि स्थानिय लोकाधिकार समिती सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. तसेच निवडणूक आयोग बोगस आहे. याला खरेतर निवडणूक चुना लगाओ आयोग म्हणायला हवे, असा खोचक टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. 

निवडणुक आयोग बोगस आहे. त्याला चुना लावणारा आयोग म्हणायला हवे. रामविलास पासवान यांच्या निकालाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले की, सगळे भाजपच्या सोयीने सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाला चोमडेपणा करायची गरज नव्हती. कदाचित सरकारला अशा प्रकारचा निर्णय अपेक्षित आहे, असे निवडणूक आयोगाला सूचवायचे असेल, अशी मोठी शक्यता उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवली. 

ठाकरे नाव वगळून, स्वतःच्या वडिलांच्या फोटो लावून लढून दाखवा

भाजप आणि शिंदे गटावर घणाघाती टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आई-वडिलांनी दिलेले संस्कार झाले नाहीत की दुसऱ्याची गोष्ट चोरण्याची वेळ येते, ती त्यांच्यावर आली. आपले शत्रू कोण हे सर्वांना माहिती आहे. दूध का दूध और पानी का पानी आम्ही करणार. केवळ एवढेच नाही, तर तुमचे गोमूत्र कसे आहे, तेही आम्ही दाखवणार आहोत. तुमच्यात हिंमत असेल तर आव्हान देतो की, ठाकरे नाव वगळा आणि शिवसेना चालवून दाखवा. स्वतःच्या वडिलांचा फोटो लावून शिवसेना चालवून दाखवा. स्वतःच्या वडिलांचे नाव लावा आणि या, मग बघू तुमचे काय होते ते, असे खुले आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले. 

दरम्यान, जे मी सांगतोय ते सगळ्यांना पटायला लागले आहे. आता डोळे उघडले नाहीत, तर २०२४ ची निवडणूक देशातील शेवटची निवडणूक असेल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येऊन गेले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा फोन येऊन गेला. सगळे विरोधक एकत्र येऊ लागले आहेत. सर्वोच्च न्यायालय शेवटची आशा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केवळ शिवसेनेचा नाही, तर देशाच्या भविष्याचा असेल, असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेना