I.N.D.I.A. बैठकीपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का; संजय राऊतांचा विश्वासू शिलेदार शिंदे गटात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 11:08 AM2023-08-31T11:08:51+5:302023-08-31T11:10:48+5:30
Thackeray Group Vs Shinde Group: गेले दीड वर्षे प्रभागात एकही विकासकाम होऊ शकले नाही. त्याने व्यथित होऊन शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे संजय राऊतांच्या निकटवर्तीयाने सांगितले.
Thackeray Group Vs Shinde Group: भाजपविरोधात एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक दोन दिवस मुंबईत होत आहे. या बैठकीतून केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला जाईल. मागील दोन महिन्यांत पाटणा व बंगळुरूत बैठकांमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती असून मुंबईतील बैठकीत हा फॉर्म्युला कसा असेल, यावर चर्चा होऊन तो अंतिम होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीचे यजमान पद शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे आहे. मात्र, या बैठकीपूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानल्या शिलेदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
ठाकरे गटाचे मुंबईच्या विक्रोळी विभागातील कन्नमवारनगरचे माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेमध्ये स्वागत करून भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंत यांना शुभेच्छा दिल्या. उपेंद्र सावंत यांनी यावेळी बोलताना गेले दीड वर्षे आपल्या प्रभागात एकही विकासकाम होऊ शकले नसल्याने व्यथित होऊन आपण शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत असल्याचे सांगितले.
विकासकामे होत नसतील तर नगरसेवक काय करणार..?
शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या नगरसेवकांची संख्या आता ३३ झाली असून त्यातील २५ हे ठाकरे गटाचे असल्याचे सांगितले. ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले त्याच लोकांची कामे करणे शक्य होत नसेल, विकासकामे होत नसतील तर नगरसेवक काय करणार..? त्यामुळेच अनेक नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे यासमयी स्पष्ट केले.
दरम्यान, संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी याबाबत बोलताना मोठा दावा केला. १० दिवसांपूर्वी उपेंद्र सावंत मला म्हणाला की, मला सुद्धा ऑफर आहे. निधी करिता १५ कोटी आणि पाच कोटी कॅशची ऑफर आहे. त्यावेळी तो मला म्हणाला मी निष्ठावंत आहे मी घरी बसेल पण मी शिंदे गटात जाणार नाही. नंतर मी त्याला खूप फोन केले. पण त्याने माझे फोन घेतले नाहीत. नंतर मी त्याच्या बहिणीला फोन केला आणि मी तिला म्हणालो की, मी नसतो तर तो आज जेलमध्ये असता. माझ्याकडे त्याच्या चार ते पाच क्लिप अशा आहेत की त्या जर मी सोशल मीडियावर टाकल्या तर तो आपल्या मुलीला आणि बायकोला तोंड दाखवणार नाही. परंतु अशा गोष्टी करणे योग्य नाही हे आम्हाला कळते. मी उद्धव साहेबांना सांगितले की, पंधरा कोटींचा फंड आणि पाच कोटी कॅशवर उपेंद्र सावंत पक्ष सोडून चालला आहे, असे सुनील राऊत म्हणाले.