पक्षाला धक्क्यांवर धक्के! बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंची चर्चा, नेमके काय घडतेय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 18:43 IST2025-02-17T18:43:32+5:302025-02-17T18:43:58+5:30
Shiv Sena Thackeray Group Vaibhav Naik News: कोणी कितीही दबाव आणला तरी, त्याला बळी पडणार नाही. उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही. ठाकरे गटाची नव्याने बांधणी करणार असल्याचे या नेत्याने म्हटले होते.

पक्षाला धक्क्यांवर धक्के! बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंची चर्चा, नेमके काय घडतेय?
Shiv Sena Thackeray Group Vaibhav Naik News: मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असल्याचे चित्र आहे. अनेक वर्ष पक्षासाठी काम केलेले लोकही उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत आहेत. अलीकडेच कोकणातील ठाकरे गटाचा मोठा चेहरा असणाऱ्या राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. तर, दुसरीकडे भास्कर जाधव हेही ठाकरे गटाची साथ सोडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ठाकरे गटाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही, तसेच पक्षाला एकामागून एक धक्के बसत आहेत. अशातच एका नेत्याने सरळ मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा जबाब नोंदवण्यासाठी वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक रत्नागिरीत हजर झाले होते. तब्बल साडेसहा तास ही चौकशी सुरू होती. याच वैभव नाईक यांनी आता उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी थेट मातोश्री गाठली.
उद्धव ठाकरेंची चर्चा, नेमके काय घडतेय?
एसीबीच्या माध्यमातून त्रास दिला जात असला तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले आहे. यानंतर आता वैभव नाईक यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. परंतु, या भेटीत काय चर्चा झाली, याबाबतचा तपशील अद्याप तरी गुलदस्त्यात आले. तर दुसरीकडे, ठाकरे गटाची नव्याने बांधणी करत असल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले होते. तसेच एसीबी चौकशीचा दबाव शिंदेसेनेत किंवा भाजपामध्ये जाण्यासाठी आहे का, असा प्रश्न करण्यात आला असता, आपण उद्धवसेनेतच राहणार असून, कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, असे वैभव नाईक यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांत आपण तीन वेळा चौकशीला हजर राहिलो आहोत. मी आणि माझ्या पत्नीच्या उत्पन्नाचा स्रोत, आम्ही खरेदी केलेल्या जागा याची माहिती मागितली गेली. आपण ती विहीत नमुन्यामध्ये सादर केली आहे. प्रतिज्ञापत्रावर आवश्यक असलेली माहिती तशा पद्धतीने दिली आहे. चौकशीच्या प्रत्येक टप्प्यावर आपण आवश्यक ते सहकार्य केले आहे आणि यापुढेही करत राहू, असे वैभव नाईक म्हणाले होते.