अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने दिला डमी उमेदवार, काय कारण? जाणून घ्या...
By मनोहर कुंभेजकर | Published: October 14, 2022 07:08 PM2022-10-14T19:08:54+5:302022-10-14T19:09:04+5:30
माजी नगरसेवक आणि युवासेनेचे पदाधिकारी संदीप नाईक यांनी डमी अर्ज भरला आहे.
मुंबई: अंधेरी (पूर्व ) विधानसभा मतदारसंघात येत्या ३ नोव्हेंबरला दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना महविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ऋतुजा लटके यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. मात्र जर तांत्रिक कारणाने लटके यांचा अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केल्यास पक्षाकडे उमेदवार नसल्याची नामुष्की येवू नये, यासाठी शिवसेनेने सावध पवित्रा घेत प्रभाग क्रमांक ८१ चे माजी नगरसेवक आणि युवासेनेचे पदाधिकारी संदीप नाईक यांचा सुध्दा डमी अर्ज भरला आहे.
संदीप नाईक यांनी न्यायालयत धाव घेतल्यावर मुरजी पटेल यांचे नगरसेवकपद अवैध जातीच्या दाखल्याने रद्द झाले होते. मग दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संदीप नाईक यांना प्रभाग क्रमांक ८१ चे नगरसेवकपद मिळाले होते. ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज छाननीत मंजूर झाल्यावर संदीप नाईक त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची माहिती माजी मंत्री व विभागप्रमुख अॅड.अनिल परब यांनी दिली.
अखेर ऋतुजा लटके यांनी निवडणूक अर्ज भरला
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने स्वीकारला. त्यानंतर अंधेरी पूर्व मालपा डोंगरी क्रमांक ३ गणेश मंदिर येथे निवडणुकीचा नारळ फोडला. येथून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. मग त्यांनी अंधेरी पूर्व, गुंदवली म्युनिसिपल शाळा (मांजरेकर वाडी) या ठिकाणी आपला निवडणूक अर्ज भरला. यावेळी माजी मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, माजी मंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री व विभागप्रमुख अॅड. अनिल परब, खासदार गजानन कीर्तिकरसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.