जरा ही घराणेशाही बघा; भाजपाच्या खांद्यावर बंदूक ठेवत अंबादास दानवेंचा एकनाथ शिंदेंवर 'नेम'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 05:11 PM2024-01-11T17:11:59+5:302024-01-11T17:13:11+5:30

एकनाथ शिंदेंच्या टीकेवर विधान परिषदमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुरावा देत प्रत्युत्तर दिलं आहे. 

Thackeray group leader Ambadas Danve has criticized Chief Minister Eknath Shinde. | जरा ही घराणेशाही बघा; भाजपाच्या खांद्यावर बंदूक ठेवत अंबादास दानवेंचा एकनाथ शिंदेंवर 'नेम'

जरा ही घराणेशाही बघा; भाजपाच्या खांद्यावर बंदूक ठेवत अंबादास दानवेंचा एकनाथ शिंदेंवर 'नेम'

मुंबई: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हाच मूळ शिवसेना असल्याचा निकाल दिला. या निकालामुळे शिंदे यांच्या गोटात आनंदाचं वातावरण असून या निकालाचा आधार घेत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली. 

"निकालावरून एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली आहे. पक्ष स्वतःची संपत्ती समजून कोणीही मनाला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही. पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नव्हे, हे भानही या निकालाने दिलं आहे," अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. एकनाथ शिंदेंच्या या टीकेवर विधान परिषदमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुरावा देत प्रत्युत्तर दिलं आहे. 

अंबादास दानवे ट्विट करत म्हणाले की, ज्या महाराष्ट्रात आपण आणि आपल्या गटाचे ४० आमदार महाराष्ट्रातील भाजपाची पालखी धापा टाकत वाहत आहात, त्याच भाजपची महाराष्ट्रातील घराणेशाही एकदा बघा. २०१९ साली महाराष्ट्रातील भाजपाचे विधानसभेचे उमेदवार आणि त्यांचा कौटुंबिक राजकीय वारसा देतो आहे. पाहा, वाचा...कारण याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागणार आहे. यापुढे देशाची यादी लागली तरी सांगा, असं आव्हान देखील अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेंना दिलं आहे.  रस्त्यावरील शिवसैनिक पारखून, त्याला निवडून आणण्याचे काळीज फक्त शिवसेनेत होते...आहे आणि राहणार. आयात उमेदवारांची जत्रा तुम्ही तुमच्या खांद्यावर घेऊन फिरत आहात. कायदेशीर लढाया येतील आणि जातील. कायम असेल ती निष्ठा आणि विश्वास...असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी घराणेशाहीवरून उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. "श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेंचा मुलगा नाही का?" असं म्हटलं आहे. तसेच शिवसेनेला इतिहासात जमा करणारे स्वतः गाडले गेले असं म्हणत हल्लाबोल केला आहे. "एकनाथ शिंदे घराणेशाहीचा अंत झाल्याचं म्हणतात मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का?, सिद्ध करा नाही म्हणून, श्रीकांत शिंदेंसाठी मुलगा म्हणूनच मत मागितलं ना," असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच "बाळासाहेब ठाकरे यांची घराणेशाही कधीच नव्हती. शरद पवारांची घराणेशाही कधीच नव्हती, यशवंतराव चव्हाणांची घराणेशाही कधीच नव्हती. विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारा एक मार्ग असतो. एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाहीचे पुरस्कर्ते आहेत. शिवसेनेला इतिहासात जमा करणारे स्वतः गाडले गेले" असं म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. 

Web Title: Thackeray group leader Ambadas Danve has criticized Chief Minister Eknath Shinde.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.