'येणाऱ्या आठ दिवसात शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार'; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 04:37 PM2023-04-14T16:37:51+5:302023-04-14T16:53:08+5:30
येणाऱ्या आठ दिवसात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
येणाऱ्या आठ दिवसात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे हे फक्त आठ दिवसाचे पालकमंत्री आहेत, असंही खैरे म्हणाले. संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
सचिन वाझेला नोकरीत कोणी घेतलं?; माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी थेट नाव सांगितले
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन ९ महिने उलटून गेली. शिवसेनेतील फुटीवर सुप्रीम कोर्टातही सुनावणी सुरू आहे. काही दिवसातच सुप्रीम कोर्टाचा निकाल हाती येऊ शकतो असं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी येणाऱ्या आठ दिवसात शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा केला आहे.
दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवेसेनेच्या आमदारांनी अयोध्येत भेट देऊन श्री रामाचे दर्शन घेतले. यावरुनही राज्यभरात आरोप-प्रत्यारोप झाले. तर दुसरीकडे काल माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सदंर्भात खुलासा केला. मे महिन्यात एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंसमोर येऊन रडले होते असा दावा केला होता.
“आदित्य ठाकरे साधे, सरळ अन् सुसंस्कृत, ते कधीही खोटे बोलणार नाहीत”
ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस आणखीन वाढताना दिसत आहे. यातच आता आदित्य ठाकरे यांनी केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. राजकीय वर्तुळातून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप तसेच शिंदे गटातील नेते आदित्य ठाकरेंच्या विधानावरून दावे-प्रतिदावे करत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरेंना पाठिंबा देत, ते कधी खोटे बोलत नाहीत, असे म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले होते की, हे चाळीस लोक त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी भाजपाबरोबर गेले आहेत. तिकडे जाण्याचे दुसरे कोणतेही कारण नव्हते. केंद्रीय तपास यंत्रणा अटक करतील, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपबरोबर चला नाहीतर मला अटक होईल, असे त्यांनी त्यावेळी सांगितलं होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला. यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.