Join us  

"शब्दाला जागा आणि राजकारण सोडा"; मनसेच्या माजी नेत्याचे आशिष शेलारांना खरमरीत पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 3:05 PM

Kiritkumar Shinde to Aashish Shelar : भाजप नेते आशिष शेलार यांनी राजकारण सोडेन असं वक्तव्य केल्यानंतर ठाकरे गटातील नेत्याने त्यांना खरमरीत पत्र लिहीलं आहे.

Aashish Shelar : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. ४८ पैकी ३० जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. दुसरीकडे महायुती आणि भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. भाजपने ४५ पेक्षा अधिक जागा निवडून येणार असल्याची घोषणा केली असली तरी त्यांना केवळ १७ जागांवर यश मिळालं आहे. मात्र आता महाविकास आघाडीच्या नेते भाजपसह मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना चांगलेच लक्ष्य करत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला १८ पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असं शेलार म्हणाले होते. त्यामुळे आता ३० जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आशिष शेलार यांना डिवचलं जात आहे.

निवडणुकीआधी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला १८ पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असं विधान केलं होतं. शेलार यांच्या या विधानावरुन विरोधकांनी त्यांना घेरलं आहे. आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करता, तेवढे सांगा, असा टोला शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला होता. त्यानंतर आता मनसेतून ठाकरेसेनेत आलेल्या कीर्तिकुमार शिंदेंनीही शेलारांना सुनावलं आहे. तुम्ही मर्द आहात आशिषजी, शब्दाला जागा आणि राजकारण सोडा, असा खोचक सल्ला कीर्तिकुमार शिंदे यांनी लगावला आहे. कीर्तिकुमार शिंदे यांनी फेसबुकवर पत्र लिहीत आशिष शेलार यांना टोला लगावला आहे.

काय म्हटलंय पत्रात?

"प्रति,मर्दश्री. आशिषजी शेलार,भाजप नेते, मुंबई. यांसी जय महाराष्ट्र! लेच्यापेच्यांच्या महाराष्ट्रीय राजकारणात आपण नेहमीच दाखवत असलेल्या बेधडक मर्दानगीबाबत सर्वप्रथम आपलं मनःपूर्वक अभिनंदन. नुकताच आपला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आपण म्हणता त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला ४५ जागा मिळणे अपेक्षित होते. खरंतर महाराष्ट्रात तुम्हाला ५६ जागा मिळायला हव्या होत्या. छप्पन इंच छातीच्या राजकीय विचारांचे तुम्ही महाराष्ट्रातील शिलेदार ना! पण काय करणार? महाराष्ट्रात लोकसभेच्या जागाच ४८ आहेत. म्हणून ४५ जागा जिंकण्याचा तुमचा मर्दानी आत्मविश्वास योग्यच. तरी प्रत्यक्ष निवडणुकीत तुमच्या पक्षाला ९ तर युतीला १७ जागा मिळाल्या! तुमच्या आत्मविश्वासापेक्षा फक्त ३६/२८ कमी!! देशात 'अब की बार ४०० पार'ची घोषणा देऊन २३८ जागा मिळवणाऱ्या मर्दानी नेत्यांच्या पक्षासाठी हे योग्यच; नाही का?, समजा, महाराष्ट्रात तुम्ही खरंच ४५ जागा जिंकल्या असत्या तर राज्यात तुम्ही कुणालाही राजकारण सोडायला भाग पाडलं असतं. तसंही गेल्या काही वर्षांत तुमच्या पक्ष नेतृत्वाने अनेकांना राजकीय बाजारातून 'उठवलं' आहे (पक्षी श्री. अजित पवार) आणि त्याहून अधिक लोकांना राजकीय बाजारातून 'उठवण्याची भीती' दाखवून (पक्षी श्री. एकनाथ शिंदे, श्री. अशोक चव्हाण) आपल्या चारित्र्यवान 'पार्टी विथ डिफरन्स'च्या राजकारणात सामावून घेतलं आहे. एखाद्याला राजकारणातून आणि आयुष्यातून 'उठवण्याचा' तुमच्या पक्षाचा स्ट्राईक रेट जबरदस्त आहे. त्याबद्दलही आपलं मनःपूर्वक अभिनंदन," असे कीर्तिकुमार शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

"आता आठवणीने सांगायचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा : शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही आव्हान दिलं होतं की, महाविकास आघाडीला महाराष्ट्रात एकूण मिळून जरी १८ जागा जिंकता आल्या तर "मी राजकारण सोडेन"! आशिषजी, मला पूर्ण कल्पना आहे की तुमचा पक्ष आणि स्वतः तुम्ही शब्दाला पक्के आहात. कारण तुमच्यावर संस्कारच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत. जे सत्य आहे- खरं आहे तेच बोलायचं आणि दिलेला शब्द पाळायचा हाच तुमच्यावर झालेला संघ संस्कार. मोदीसाहेब- शहासाहेब काय आणि फडणवीससाहेब- शेलारसाहेब काय; तुम्ही सर्व शब्दाला पक्के! अस्सल मर्द! एक खरा मर्दच त्याने दिलेला शब्द कधी मागे घेत नाही. मोदीसाहेबांचेच बघा ना; प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचा आपला अतिमौल्यवान शब्द त्यांनी कधीच मागे घेतला नाही! खरं ना?. आशिषजी, तुम्हाला उज्ज्वल भविष्य आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी आपलं नाव कोरण्याची संधी आज तुमच्यासमोर हात जोडून विनवणी करत उभी आहे. मला आशा आहे की, या संधीला तुम्ही मिठीत घ्याल. तुम्ही तुमची लाखमोलाची राजकीय विश्वासार्हता जपाल. तुम्ही मर्द आहात, आशिषजी. शब्दाला जागा, आशिषजी. राजकारण सोडा, आशिषजी. शुभेच्छांसह धन्यवाद. आपला नम्र, कीर्तिकुमार शिंदे," असेही शिंदेंनी म्हटलं आहे.

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४आशीष शेलारभाजपामुंबई