मुंबई: अलीकडेच मुंबईतील खारघर परिसरात झालेल्या महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्यानंतर १४-१५ श्रीसदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निष्काळजीपणाचे आरोप केले जात आहेत. खारघर घटनेत सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या या मागणीवर काल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली. कोरोना काळातही सरकारकडून अनेक हलगर्जीपणाच्या घटना घडल्या आहेत. त्या घटनांमध्येही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो. उगाच यात राजकारण करण्याची गरज नाही. तो कार्यक्रम सकाळी नव्हता करायला पाहिजे होता, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंच्या या विधानावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला. भारतीय जनता पक्षाने काही पोपट पाळून ठेवले आहेत. त्यांना बोलू द्या. नोटबंदीच्या वेळेस हजारोंच्यावर लोक रांगेत उभं राहून मृत्यूमुखी पडल होते. तो सदोष मनुष्यवधच होता. त्यावरही भाजपाच्या पोपटांना बोलावं. कोरोनाच्या वेळेस गंगेत हजारो प्रेतं वाहत आली होती. गुजरातमध्ये तर प्रेतं जाळायला जागाही नव्हती. मग गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज ठाकरे यांनी करावी, असं संजय राऊत म्हणाले. तसेच राज ठाकरे हे आता जगाचे नेते बनले आहेत, असा टोलाही संजय राऊतांनी यावेळी लगावला.
दरम्यान, मराठा आरक्षण हा तांत्रिक विषय आहे. त्यावर मी नंतर बोलतो. पण सत्ता द्या, आरक्षण देतो असं फडणवीस सांगत होते. धनगर आरक्षण असो, मराठा आरक्षण असो किंवा अन्य समाज असतील. आता काय झालं? तुमच्या हातात ९ महिन्यापासून सत्ता आहे. सीमा प्रश्नापासून मराठा आरक्षणापर्यंत कोणताही निकाल लागत नाही. का तुमची पावलं का पडत नाहीत त्या दिशेने? तुमची दातखिळी का बसली आहे त्या विषयावर?, असे सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले. शिवसेना आमच्या हातून काढून घेण्यासाठी तुमच्या हालचाली बरोबर असतात. मराठा आरक्षणाबाबत तुम्ही कुठे कमी पडलाय? तुम्ही लोकांसमोर येऊन सांगायला हवं, असं आव्हान देखील संजय राऊत यांनी यावेळी दिलं.