भिजलेलं काडतूस... तुम्ही झुकलेलेच आहात, ED, CBI बाजूला ठेवून या; संजय राऊतांचं फडणवीसांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 10:11 AM2023-04-05T10:11:56+5:302023-04-05T10:12:03+5:30
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
मुंबई: ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं.
काय होतास तू, काय झालास तू, असा कसा वाया गेलास तू? उद्धव ठाकरे मला फडतूस गृहमंत्री म्हणतात, मात्र मी फडतूस नाही काडतूस आहे. झुकेगा नही तो घुसेगा, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अडीच वर्षांचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमके फडतूस कोण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेवर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
तुम्ही ठाकरे परिवारातील सदस्याला काय म्हणालात, कोणत्या शब्दात बोललात, ते महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. ईडी, सीबीआय भाजपाचे बॉडीगार्ड आहे. ईडी, सीबीआय बाजूला ठेवा, मग काडतूसचा अर्थ सांगतो, असं आव्हान संजय राऊतांनी दिलं. तसेच तुमचं काडतूस भिजलेलं आहे, ते उडत नाही, असंही संजय राऊत म्हणाले. तुम्ही झुकेगा नही, म्हणताय, मात्र तुम्ही झुकलेलेच आहात. शिंदेसोबत काम करायला लागणं म्हणजे झुकणचं आहे. ज्याला नीट वाचता येत नाही, अशा व्यक्तीसोबत तुम्ही काम करताय, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांनी विधानभवनाच्या साक्षीने हसतहसत हस्तांदोलन केल्याच्या तेराव्या दिवशी दोघांमध्ये शाब्दिक राडा झाला. फडणवीस हे फडतूस गृहमंत्री असून, त्यांना गृहमंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी राजीनामा द्यावा, अशा शब्दांत ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. त्यावर, अडीच वर्षांच्या काळात ज्यांनी घरी बसून काम केले, त्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये. आम्ही तोंड उघडले तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असे फडणवीस यांनी ठाकरेंना ठणकावले.
महिला गुंडांचीही गँग तयार होतेय- उद्धव ठाकरे
राज्यात गुंडगिरीचे राज्य आहे. यांना मुख्यमंत्री म्हणायचे की गुंडमंत्री म्हणायचे हे लोक ठरवतील. त्यांनी गुंडमंत्री असे पद निर्माण करून गुंड पोसण्याचे काम त्या मंत्र्याकडे द्यावे. ठाण्यात आता महिला गुंडांचीही गँग तयार होऊ लागली आहे. आम्ही आमच्यावरील संस्कारामुळे शांत आहोत, पण जर ठरविले तर एका क्षणात ठाणेच काय तर महाराष्ट्रातील गुंडगिरी उपटून काढू शकतो, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. यापूर्वी भाजपच्या ठाण्यातील पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या नेत्यांनी मारहाण केली तेव्हाही ठोस कारवाई झाली नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
त्याहून खालची भाषा मला येते- देवेंद्र फडणवीस
राज्याचा गृहमंत्री असल्याने अनेक लोकांना अडचण होत असून, ते देव पाण्यात ठेवून बसले आहेत. मी कुठल्याही स्थितीत हे पद सोडणार नाही. चुकीचे काम करेल, त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही घटनेची निष्पक्ष चौकशी सरकार करेल. पंतप्रधान मोदी यांचे फोटो लावून ते निवडून आले व त्यानंतर खुर्चीसाठी लाळघोटेपणा केला. खरा फडतूस कोण हे सर्वांनाच माहिती आहे. मी नागपूरचा आहे. ते ज्या भाषेत बोलले त्याहून खालची भाषा मला येते. पण, माझी तसे बोलण्याची पद्धत नाही’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.