शीतल म्हात्रे म्हणतात की, 'प्रकाश सुर्वेंसोबत माझे बहिण-भावाचे नाते आहे, मग...'; सुषमा अंधारेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 06:25 PM2023-03-14T18:25:56+5:302023-03-14T18:28:58+5:30
शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी राज्यात वादंग निर्माण झाले आहे. या व्हायरल व्हिडिओचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटत आहेत. आमदार सुर्वेच्या मुलाची तक्रार आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज (२७) याने दहिसर पोलिसात तक्रार दिली होती. ज्यात @bhaiyapatil या ट्विटर अकाऊंटवरून त्याला या मॉर्फ व्हिडीओ प्राप्त झाला होता. जो मानस कुवरने शेअर केला.
मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत लाऊड स्पीकर आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांच्या गोंगाटात काही ऐकू येत नसल्याने म्हात्रे या सुर्वेच्या जवळ जाऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, तोच व्हिडीओ मॉर्फ करत घाणेरड्या प्रकारे व्हायरल करण्यात आल्याने माझ्या वडिलांची बदनामी झाली, असे राजने दहिसर पोलिसांना सांगितल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
म्हात्रे प्रकरणावर अंबादान दानवे म्हणाले; "माझ्याकडे 'तो' व्हिडिओ आला, मी पण १० लोकांना पाठवला"
सदर प्रकरणावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदर व्हिडिओ पाहता, हा व्हिडिओ अत्यंत जवळून रेकॉर्ड झालेला आहे. म्हणजे हा व्हिडिओ त्यांच्याच कोणीतरी जवळच्या माणसाने रेकॉर्ड केलाय, हे दिसून येतंय. सदर व्हिडिओ आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन लाइव्ह केला होता. मात्र काही वेळेनंतर तो डिलीट करण्यात आला, असं सुषमा अंधारेंनी सांगितले.
सदर व्हिडिओ प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे या दोघांचा आहे. त्यामुळे बदनामी होत असेल, तर फक्त शीतल म्हात्रेंचीच नाहीतर प्रकाश सुर्वेंची देखील होतेय. मात्र आतापर्यंत प्रकाश सुर्वे सुरु असलेल्या चर्चेत कुठीही फ्रेममध्ये आल्याचे दिसून येत नाही. प्रकाश सुर्वे या प्रकरणावर कोणतीय प्रतिक्रिया देत नाहीय. एकीकडे शीतल म्हात्रे म्हणतात की, आमचे बहिण-भावाचे नाते आहे. मात्र प्रकाश सुर्वे एक भाऊ म्हणून, एक जबाबदार व्यक्ती म्हणून कोणतीच प्रतिक्रिया देताना दिसून येत नाहीय, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सदर व्हायरल व्हिडिओचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटत आहेत. त्यावर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्यात जुगलबंदी झाली. या प्रकरणात १४ मुलांना अटक केलीय. तो व्हिडिओ खरा की खोटा हे समोर येऊ द्या. रात्री २-२ वाजता पोलीस पोरांना उचलतायेत असा दावा जितेंद्र आव्हाडांनी सभेत केला.
मंत्री शंभुराज देसाई यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिले. शीतल म्हात्रे, राज प्रकाश सुर्वे यांच्याकडून आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई केली. शीतल म्हात्रे या माध्यमांसमोर रडत होत्या. एखाद्या महिलेच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. कुठल्याही स्त्री मनाला हे सहन होणार नाही. रात्री २ वाजता उचलले पण हा तपासाचा भाग आहे. परंतु हे करताना काही वाटलं नाही का?, असा सवाल शंभुराज देसाई यांनी उपस्थित केला.