Join us

दहिसरमधील गैरसोयींविरोधात पालिका कार्यालयावर ठाकरे गटाचा मोर्चा

By रेश्मा शिवडेकर | Published: May 29, 2024 6:50 PM

गेले काही दिवस दहिसर विभागात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे अनेकदा वीजपुरवठा खंडीत होतो.

मुंबई - दहिसर विभागातील रस्त्यांची रखडलेली कामे, नाल्यांची अर्धवट सफाई याविरोधात उद्धवसेना, काँग्रेस, आप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या महाविकास आघाडीतील पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत पालिका आर उत्तर विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

गेले काही दिवस दहिसर विभागात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे अनेकदा वीजपुरवठा खंडीत होतो. रस्त्यांची कामे सुरू असल्याने या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होते. येथील दहिसर नदीची साफसफाई न झाल्याने गाळ यातून राहिला आहे. काही ठिकाणी नाल्यांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. या विषयी पालिका कार्यालयाकडे वारंवार तक्रार करूनही दाद न मिळाल्याने हा मोर्चा काढण्यात आल्याचे दहिसरचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी सांगितले. सकाळी साडेनऊच्या सुमारास दहिसर (पूर्व) येथील आनंद नगर मेट्रो स्टेशनजवळील शिव मंदिर येथून आर/ उत्तर विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

मोर्चात विनोद घोसाळकर यांच्यासोबत काँग्रेसचे भूषण पाटील, आम आदमी पार्टीचे संदीप मेहता व गोपाळ झवेरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे दुबे, शिवसेनेचे आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर व संध्या दोषी तसेच महाविकास आघाडी घटक पक्षाचे उत्तर मुंबईचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

पालिका प्रशासनाकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे रहिवाशांना त्रास होतो आहे. पालिकेने पावसाळ्याआधी दहिसर व आनंद नगर परिसरातील अर्धवट कामे तात्काळ पूर्ण करावी. अन्यथा आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल- विनोद घोसाळकर

टॅग्स :उद्धव ठाकरेमुंबई महानगरपालिका