Join us

Aaditya Thackeray Live: “मुंबईने देशाला मार्ग दाखवला, शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना”: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 10:21 PM

Aaditya Thackeray Live: मनात केवळ सत्यमेव जयते, सत्यामेव जयते नाही. आम्हाला बोलायला लावू नका नाहीतर तुम्हाला फिरणे कठीण होईल, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला.

Aaditya Thackeray Live: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात फिरत आहे. गद्दारांच्या मतदारसंघातही गेलो आहे. मात्र, सर्व ठिकाणी लोकांचा पाठिंबा हा उद्धव ठाकरेंनाच असल्याचे दिसून येत आहे, असे सांगत मुंबईने देशाला मार्ग दाखवला आहे. शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजेच शिवसेना असल्याचे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवसंवाद यात्रेदरम्यान मुंबईतील शिवसैनिक निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते. 

या शिवसैनिक निर्धार मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे यांनी अनेकविध मुद्द्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर घणाघाती टीका केली. तसेच झारखंडमधून कोळी बांधवांची टोपी घालून कोणी आले नाही ना, अशी खोचक विचारणा करत नुसत्या रिकाम्या खुर्च्या दाखवण्यापेक्षा या कट्टर शिवसैनिकांची गर्दी माध्यमांनी दाखवावी, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. मी वरळीत असताना आले नाहीत, छत्रपती संभाजीनगरला गेल्यावर वरळीत आले. त्यांची हिंमत झाली नाही, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली. 

भाजप-गद्दारांचे सरकार मुंबईला दिल्लीसमोर झुकवण्याचे काम करतायत

महाविकास आघाडीचे सरकार असताना आपण वरळीसह मुंबईत अनेक सुधारणा केल्या. सुशोभिकरणाची कामे केली. ऐतिहासिक असलेल्या जांबोरी मैदानासाठी अडीच कोटी खर्च केले. मात्र, या भाजप आणि ४० गद्दारांच्या सरकारने विविध कार्यक्रम घेऊन या मैदानाची वाट लावून टाकली. आपण सुरू केलेली अनेक कामे या सरकारने बंद केली. मुंबईभर पोस्टर लावून पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. किती खर्च करायचा तो करू द्या. सामान्य शिवसैनिकांना हे सरकार घाबरत आहे. या भीतीमुळेच विविध यंत्रणांचा वापर करून आवाज दाबण्याचे काम केले जात आहे. काही झाले तरी शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना आहे, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

गद्दारांचे सरकार अल्पायुषी, कोसळणार म्हणजे कोसळणारच

कोरोना काळात काहीही माहिती नसताना आपण मुंबईकरांसाठी अनेक गोष्टी राबवल्या. हॉस्पिटलपासून खाण्या-पिण्याची सोय केली. कोरोना काळात मुंबईत जे काम झाले, त्याची दखल देशाने घेतली. देशभरातून अधिकारी यायचे आणि कसे काम केले याची माहिती घ्यायचे. दिवस-रात्र आपण काम केले. मुंबईने देशाला मार्ग दाखवण्याचे काम केले आहे, असे आदित्य ठाकरेंनी नमूद केले. तसेच यांच्या लायकीप्रमाणेच आपण बोलायचे. मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधी हे सरकार कोसळणार. गद्दारांचे सरकार अल्पायुषी आहे. ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. गद्दारांचा गेम ओव्हर झाला आहे, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केली.

यांचे नवे मित्रच घोटाळ्यांची माहिती आम्हाला पुरवत आहेत

नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत या गद्दारांचे अनेक घोटाळे समोर आले. मात्र, यांचे नवे मित्रच या घोटाळ्यांची माहिती आम्हाला देत होते, असा मोठा दावा आदित्य ठाकरेंनी यावेळी केला. तसेच देशातील वातावरण लोकशाहीसाठी घातक होत चालले आहे. हे सरकार मुंबई विकायला निघाले आहेत. महाराष्ट्रात अंधःकारात नेत आहेत. अनेक प्रकल्प गुजरातला गेले. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात की गुजरातचे, असा खोचक प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला. 

दरम्यान, तुम्ही आमचे कितीही नाव चोरले, पक्षचिन्ह चोरले तरीही जनतेचे प्रेम आणि आशिर्वाद चोरू शकत नाही. तुमच्या माथी गद्दरांचा शिक्का, तो कधीही पुसला जाणार नाही. माझ्या मनात केवळ सत्यमेव जयते, सत्यामेव जयते नाही. आम्हाला बोलायला लावू नका नाहीतर तुम्हाला फिरणे कठीण होईल, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :आदित्य ठाकरेएकनाथ शिंदेभाजपा