मुंबई: संजय राऊत फक्त जॅकेट घालून पोपटपंची करतात. संजय राऊत दिसले की लोक टीव्ही बंद करतात, अशी टीका रामदास कदम यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनी केली होती. तसेच संजय राऊत तुम्ही शिवसेनेत आला कधी?, तुम्हाला बाळासाहेब कधी समजले?, भगव्या झेंड्याची शान कधी कळली?, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला होता.
शिवसेना पक्ष आम्ही वाढवलाय, आम्ही जेलवारी केलीय, तुमचं योगदान काय?, असा सवालही रामदास कदम यांनी उपस्थित केला. तसेच आपल्या मुलीची शपथ घेऊन सांग, की तुम्ही उद्धव ठाकरेंचे आहात की शरद पवारांचे, असा निशाणा देखील रामदास कदम यांनी साधला होता. रामदास कदम यांच्या या टीकेवर आता सुनिल राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांना रामदास कदम यांनी निष्ठा शिकवण्याची गरज नाही. ज्यावेळी रामदास कदम हे शिवसेनेत होते. त्यावेळी ते आमच्या घरी यायचे आणि संजय राऊत यांच्याकडे माझी राष्ट्रवादीत शरद पवारांकडे वर्णी लावा, अशी विनवणी करत होते. वेळोवेळी रामदास कदम यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासंदर्भात संजय राऊत यांच्याकडे विनंती केली. परंतु संजय राऊत यांनी रामदास कदम यांना सेनेतच राहण्याचा सल्ला दिला, असा गौप्यस्फोट आमदार सुनिल राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर कुणी खोके घेतले हे सिद्ध करावे. जर ते सिद्ध झाले तर मी त्यांच्या घरी भांडी घासेन अन्यथा त्यांनी आमच्या घरी भांडी घासावी, असं आव्हान रामदास कदम यांनी दिले. मुख्यमंत्रिपद गेले, आमदार गेले म्हणून त्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान बाप-बेट्याचे आहे. त्यामुळे १ वर्षापासून गद्दार-खोके असं सुरू आहे त्याला आता लोकंही कंटाळली आहेत, तुमच्यात हिंमत असेल तर आरोप सिद्ध करून दाखवा असं जाहीर आव्हान आहे असं त्यांनी म्हटलं होतं.