Lok Sabha Election ( Marathi News ) : महायुतीकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. भाजपासह शिंदे गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिंदे गटाला १६ जागा मिळणार असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. दरम्यान, शिवसेनेची नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा लढवणार असल्याचे बोलले जात आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी काही दिवसापूर्वी ठाण्यात कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शनही केलं होतं, यावरुन आता ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी भीती व्यक्त केली आहे.
"शिंदे गटालील खासदारांची अवस्था आता काय झाली हे आता महाराष्ट्राने पाहिलं आहे. शिंदे गटात गेलेल्या खासदारांना २०१४ मध्ये आणि २०१९ मध्ये उद्धव साहेबांनी त्या सगळ्या खासदारांना पुन्हा तिकीट दिलं होतं ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळी उद्धव साहेब कोणापुढं झुकले नाहीत. तेव्हा कोणत्याही खासदाराला शंभर गाड्या घेऊन कोणालाही भेटण्याची गरज नव्हती. त्यावेळी उमेदवार बदला अशी मागणी करण्याची हिंमत भाजपच्या नेत्यांनी केली नव्हती, आता भाजपाचे नेते उमेदवार बदला म्हणून खुलेआम मागणी करत आहेत.
"उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडण्यानंतर आता खासदारांची काय अवस्था झाली हे महाराष्ट्राने पाहिलं आहे, त्यांना आता वाटत असेल की, उद्धव ठाकरेंना आपण सोडलं ही चूक झाली. एवढंच नाही आता येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील आमदारांची अवस्था याच्यापेक्षा बिकट होईल, अशी भितीही वैभव नाईक यांनी व्यक्त केली. 'यामुळे त्यांनी आता लवकरात लवकर निर्णय घ्यावा, आता उद्धव ठाकरे त्यांना पक्षात घेणार नाहीत पण त्यांनी भाजपाला विरोध करुन आतापासूनच त्यांनी जोडणी करावी, असंही वैभव नाईक म्हणाले.
“सर्व्हेच्या नावाखाली मित्रपक्षांना संपवण्याचे काम”
बारामतीचा तिढा सुटल्यानंतर आता नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग तसेच अन्य मतदारसंघांबाबत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात खलबते सुरू आहेत. तर काही जागांवर उमेदवार बदलावेत, असा दबाव भाजपाकडून शिवसेना शिंदे गटावर असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून शिंदे गटातील सुरेश नवले यांनी भाजपावर टीका करत चांगलेच सुनावले आहे. तसेच काही आरोप अन् दावे केले आहेत.
जे नको आहेत, ते लोक बदलले पाहिजेत, असा आग्रह भाजपाचा आहे. यासाठी वारंवार सर्व्हेची कारणे दिली जात आहेत. आयव्हीचा रिपोर्ट विरोधात आहे, आम्ही जो रिपोर्ट दिला आहे तो विरोधात आहे. सर्व्हे विरोधात असल्यामुळे तुम्ही उमेदवार बदला ही भाजपची रणनिती चुकीची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सौम्य प्रकृतीचे आहेत. परंतु, ते ठाम आहेत, हा विश्वास आम्हाला आहे. भाजपाच्या एकूण षड्यंत्राला ते बळी पडणार नाहीत. पण, अशा प्रकारचे चित्र भाजपाकडून उभे केलं जात आहे. बाहेर चर्चा सुरू आहेत. आणि ही चर्चा महायुतीसाठी घातक आहे, असे नवले यांनी स्पष्टपणे सांगितले.