Sanjay Raut News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्वच पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. यातच न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीवरून विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी ही नवीन मूर्ती बनवली असल्याची माहिती मिळाली आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही नवी मूर्ती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ऑर्डर देऊन बनवली आहे. यामागचा हेतू म्हणजे आता देशात कायदा आंधळा नाही किंवा शिक्षेचे प्रतीक नाही. न्यायालयात ठेवलेली ही मूर्ती लेडी ऑफ जस्टीस नावाने ओळखली जात होती. न्यायदेवतेची आतापर्यंत ही प्रतिमा सगळीकडे वापरण्यात येत होती. त्यात डोळ्यावर काळ्या रंगाची पट्टी बांधलेली दिसायची. जुन्या मूर्तीमध्ये एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार होती. न्यायदेवतेच्या हातात संविधान देणे हा भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
जनतेने संविधान वाचवण्यासाठी मोदींचे बहुमतच काढून टाकले
न्यायदेवतेच्या हातातून तलवार काढली. आपण अनेक वर्ष ती पाहत आहे. डोळ्याला पट्टी यासाठी आहे की, माझ्यासमोर कितीही मोठी व्यक्ती असू द्या. ते पाहून मी न्याय करणार नाही. न्याय सर्वांसाठी समान आहे. गेल्या दहा वर्षात असा न्याय झाल्याचे पाहिले नाही. संविधानाचे रक्षण झाल्याचे आम्ही पाहिले नाही. त्यासाठीच लोकसभेत संविधान धोक्यात असल्याचा नारा आम्हाला द्यावा लागला. या देशात संविधान बदलायचे संपूर्ण कारस्थान रचण्यात आले होते. या देशाच्या जनतेने संविधान वाचवण्यासाठी मोदींचे बहुमतच काढून टाकले, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.
संविधानाचे रक्षण आणि संविधानानुसार काम होत आहे का?
आता उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहा. आता उघड्या डोळ्यांनी खून, बलात्कार पाहिले जात आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह तसेच करत आहे. राज्यातही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेही तसेच करत आहेत. उघड्या डोळ्यांनी सगळे करत आहेत आणि करायला लावत आहेत. त्यामुळे न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली. हातातली तलवार काढून टाकली. संविधान हातात दिले. पण संविधानाचे रक्षण आणि संविधानानुसार काम होत आहे का? अशी विचारणा संजय राऊतांनी केली.
संविधानाची हत्या रोज होत आहे
न्यायालयाचे काम आहे संविधानाच रक्षण करणे आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयात ते होत आहे का? संविधान हातात दिले. मात्र, तुम्ही तर संविधान संपवत आहात. आमच्या पक्षाने न्यायदेवीचा अनुभव घेतला. असंवैधानिक सरकार सर्वोच्च न्यायालयाने डोळ्यावर पट्टी बांधून न्याय दिला नाही. संविधानाची हत्या रोज होत आहे, अशी बोचरी टीका करत, ईव्हीएम संदर्भात घोटाळा होतो, पण तुम्ही क्लीन चीट दिली. कायद्याचा कारभार करून विरोधी पक्षाला संपवून टाकले जात आहे आणि हे तुम्ही सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहात. हा प्रोपोगंडा आहे. याला जातीय आणि धार्मिक रंग दिला जातो या देशात मुस्लीम, ख्रिश्चन, जैन समाजाने मतदान करायचे नाही का? असा थेट सवाल संजय राऊतांनी केला.
दरम्यान, न्याय देवतेची नवीन मूर्ती पूर्ण पाढऱ्या रंगाची आहे. प्रतिमेत न्याय देवतेला भारतीय वेशभूषेत दाखवण्यात आले आहे, त्यात प्रामुख्याने साडी दिसते. डोक्यावर सुंदर मुकूट आहे, कपाळावर टिकली, कानात आणि गळ्यात पारंपरिक आभूषणे आहेत. न्याय देवतेच्या एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात संविधान पकडल्याचे दाखवण्यात आले आहे.