“उद्धव ठाकरे खुली पत्रकार परिषद घेतायत, PM मोदींनी ती हिंमत दाखवावी”; संजय राऊतांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 12:35 PM2024-01-16T12:35:13+5:302024-01-16T12:36:31+5:30
Sanjay Raut News: पंतप्रधान मोदींनी १० वर्षात एकतरी पत्रकार परिषद घेतली का? आमच्या पत्रकार परिषदेवर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली.
Sanjay Raut News: आमदार अपात्रता प्रकरण निकालावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट नाराज असल्याचे वृत्त आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात, तर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात या निकालाविरोधात याचिका करण्यात आली आहे. यातच या निकालानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे खुली पत्रकार परिषद घेणार आहेत. यात कायदेतज्ज्ञांसह अन्य मान्यवर तसेच जनता उपस्थित असेल, असे सांगितले जात आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली असून, पंतप्रधान मोदींनी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान संजय राऊतांनी दिले आहे.
उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद होत आहे. हा दरोडा कसा पडला?, काय नेमके झालेय? हे ते सांगणार आहे. महापत्रकार परिषदेत दिल्लीतील दिग्गज वकीलही असणार आहेत. देशातील कोणत्याही पत्रकाराने यावे आणि प्रश्न विचारा. सगळ्यांची उत्तर दिली जातील. राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे यांनी अशी पत्रकार परिषद घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, जनतेच्या प्रश्नाची उत्तरे दिले नाहीत, मात्र आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत. मोदींनी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.
दावोसचा दौरा म्हणजे सरकारी पैशातून काढलेली सहल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारमधील काही मंत्री, अधिकारी दावोस दौऱ्यावर गेले आहेत. दावोसचा दौरा म्हणजे सरकारी पैशातून काढलेली सहल आहे. दावोसला इतका लवाजमा घेऊन गेलेत. कोट्यावधींची उधळण सुरू आहे. आधी गुजरातला जे उद्योग गेलेत ते परत आणा. आम्ही जनता फंडमधून दावोस दौऱ्याचा खर्च करू. बालिशपणा सुरू असून तुम्ही लोकशाहीचा खून केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, सध्या चार शंकराचार्य आणि एक नवपीठ तयार झाले आहे. त्याचे नाव बीजेपीपीठ आहे. मोदी जे करतील तेच होतेय. मंदिर वही बनाएंगे... आम्ही पाडले कुठे होते आणि मंदिर बनतेय कुठे हे जाऊन पाहा मग तुम्हाला कळेल, कुठे मंदिर बनतेय हे कळेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.