Join us  

‘त्याची’ देशाला फार मोठी किंमत चुकवावी लागेल; संजय राऊतांचा मोदींवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 11:20 AM

या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांवर ज्यांनी मणिपूरवर टीका केली त्यांच्यावर भाजपा नेते जाहीरपणे टीका करतायेत असं त्यांनी म्हटलं.

मुंबई - मणिपूरमधील हिंसाचार थांबत नाही. त्यामुळे संसदेत चर्चा होत नाही. मणिपूर हा देशाचा हिस्सा आहे की नाही हे ठरले पाहिजे. तुम्ही जागतिक राजकारण करता, रशिया-युक्रेनवर बोलता, आपण जगाचे नेते आहात पण त्याआधी देशाचे पंतप्रधान आहात. मणिपूरची हिंसा आता मिझारोमपर्यंत पोहचली. लोकं पलायन करायला लागली आहेत. त्यामुळे सीमेवरील शत्रू राष्ट्र या भागाचा ताबा घेतील आणि त्याची फार मोठी किंमत या देशाला चुकवावी लागेल याची भीती आम्हाला वाटते असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, देशभरातील संसदेचे प्रतिनिधी दिल्लीत आले, त्यांना मणिपूरवर चर्चा करायची आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित राहावे अशी त्यांची इच्छा आहे. मणिपूरमध्ये काय चाललेय, महिलांची नग्न धिंड काढली जातेय त्यावर सरकारने भाष्य केले पाहिजे. जे मोदींनी बाहेर माध्यमांना सांगितले ते संसदेत सभागृहात बोलायला पाहिजे. या देशात लोकशाहीचा गळा घोटला जातोय. विरोधी पक्षांचा आवाज दाबला जातोय, सरकार संसदेला मानायला तयार नाहीत. या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांवर ज्यांनी मणिपूरवर टीका केली त्यांच्यावर भाजपा नेते जाहीरपणे टीका करतायेत असं त्यांनी म्हटलं.

तसेच विरोधकांची भूमिका ही देशाची भूमिका आहे. आम्ही सगळे एकत्र जमून यापुढचे धोरण काय आखायचे हे ठरवू. विरोधकांची राष्ट्रहिताची मागणी पंतप्रधानांकडून पूर्ण होत नसेल तर लोकशाहीचा डंका जगभरात का पिटताय? चर्चा व्हायला हवी. ऐकायचे नाही. निवडणुका घेता, लोक निवडून येतात मग कशासाठी? मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता तर योग्यवेळी हिंसाचार थांबला असता. राष्ट्रपती महिला आहेत, तिथल्या राज्यपाल महिला आहेत आणि मणिपूरमध्ये महिलांची धिंड काढली जाते. मणिपूरसारखा हिंसाचार अन्य राज्यात झाला असता तर त्या राज्यातील सरकार बरखास्त केले असते असा टोलाही राऊतांनी भाजपाला लगावला आहे.

राज्यातील निधीवाटपात अपहार

माझ्या हातात तिजोरी आहे म्हणून लुटायची याला लुटमार म्हणतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही अशा कुरबुरी होत होत्या. मविआ सरकारमध्ये अजित पवार अर्थमंत्री होते, तेव्हाही निधी वाटपाबाबत कुरबुरी होत्या. माझ्यासोबत २५-४० आमदार आहेत मी त्यांचेच खिशात भरघोस निधी देईन. हा निधीवाटपातील असमतोल महाराष्ट्रातील राजकारण नासवणारे आणि खराब करणारे आहे. आमचे रवींद्र वायकर या विषयावर न्यायालयात गेलेत. निधीवाटपात कोट्यवधीचा अपहार आहे अशा शब्दात निधीवाटपावरून संजय राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

टॅग्स :संजय राऊतनरेंद्र मोदीमणिपूर हिंसाचारभाजपा