मुंबई: अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होऊन पक्षात उभी फूट पडली. यानंतर बंडखोर अजित पवार गटाने थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र, रविवारी (१६ जुलै) अजित पवार गटातील मंत्री अचानक शरद पवारांच्या भेटीसाठी गेले. यानंतर चर्चांना उधाण आले असून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे.
कोणतीही कल्पना न देता उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यासह हे सगळे नेते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दाखल झाले आणि थेट पाचव्या मजल्यावर शरद पवारांच्या दालनात पोहोचले. त्यावेळी तिथे शरद पवार आणि सुप्रिया सुळे होत्या. तिथे अजित पवार गटाचे काही नेते पवारांच्या पाया पडले आणि काही नेत्यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. शरद पवारांनी आपल्यासोबत यावे, अशी विनंतीही केली.
अजित पवारांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फुटलेले लोक हे राष्ट्रवादीचे असतील किंवा शिंदे गटाचे असतील सगळे अपात्र ठरणार आहेत. म्हणून काल ते शरद पवार यांच्या दारामध्ये उभे होते. अर्थात आम्ही त्याठिकाणी असतो तर दरवाजे बंद केले असते. बाहेरच्या बाहेर पाठवले असते, गेट लॉस्ट म्हटले असते. पण त्या पक्षाचा स्वभाव वेगळा आहे, त्यांचे चारित्र्य वेगळे आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचा स्वभाव आणि राष्ट्रवादीचा स्वभाव आणि दोघांचं चारित्र्य यामध्ये फरक आहे. आम्ही ज्या पद्धतीने रिअँक्ट होतो त्या पद्धतीने त्यांचा पक्ष होऊ शकत नाही. आम्ही रस्त्यावर उतरणारे लोक आहोत. आम्ही आरे ला कारे करणारी लोक आहोत, ते फार संयमी आहेत. फार विचार करतात नातेगोते सांभाळतात. आमच्या पक्षांमध्ये एकदा ठाकरे यांनी ठरवलं मग दरवाजे बंद म्हणजे बंद. ज्यांनी बेईमानी केली, गद्दारी केली, त्यांना आम्ही आमच्या दारात प्रवेश देत नाही, असं संजय राऊतांनी सांगितले.
...अन् पाटील निघाले
अजित गटाचे नेते पोहोचले, त्यावेळी विरोधी पक्षांची बैठक विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या दालनात सुरू होती. तेव्हा जयंत पाटील यांना अचानक सुप्रिया सुळेंचा फोन आला आणि शरद पवारांनी तातडीने बोलवले आहे, असा निरोप आला. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड बैठक सोडून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे पोहोचले. तोपर्यंत अजित पवार गटाचे नेते शरद पवारांशी चर्चा करत होते.