Join us

'रवींद्र वायकर वॉशिंग मशीनमध्ये गेले, माणसाने हिंमत दाखवायची असते'; राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 11:41 AM

रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई: महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम होण्याआधीच घटक पक्षांत पडझड सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांनी रविवारी सायंकाळी शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जात आहे. 

विशेष म्हणजे आदल्याच दिवशी गोरेगाव येथे उद्धव ठाकरेंचेरवींद्र वायकर यांनी स्वागत केले होते. दुसऱ्या दिवशीच त्यांचे पक्षांतर झाले. हा पक्षप्रवेश होण्याआधी मुंबई महापालिकेने त्यांच्याविरोधातील आरोप मागे घेतले. रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

भारतीय जनता पक्ष आता भारतीय काँग्रेस झाला आहे. रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशावर मला विचारण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय वाटतं?, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय वाटतं?, हे जाणून घ्या, असं संजय राऊत पत्रकारांना म्हणाले. मुख्य म्हणजे जे रवींद्र वायकारांना तुरुंगात टाकणार होते, त्यांनी सातत्याने रवींद्र वायकर यांच्यावर आरोप केले, ज्यांनी सातत्याने ईडीकडे तक्रारी केल्या, ते पक्षप्रवेशानंतर मुलुंडच्या घरात आतून कडी लावून बसलेले आहे. त्यांना बाहेर काढा आधी आणि त्यांचे मत घ्या, अशी टीकाही संजय राऊतांनी नाव न घेता भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर केली. 

रवींद्र वायकर आता वॉशिंग मशीनमध्ये गेले आहेत. आमच्याकडे असताना आरोप करायचे, गुन्हे दाखल करायचे, अटकेच्या धमक्या द्यायच्या, कुटुंबाला त्रास द्यायचा आणि मग त्या भीतीपोटी एखादा माणूस त्या पक्षात गेला की, तो स्वच्छ होतो, पवित्र होतो. रवींद्र वायकरांचेही तसेच झाले आहे, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. शेवटी माणसाने हिंमत दाखवायची असते. लढायच्या वेळेला पळून जाणारे यांची नोंद इतिहासात होत नाही. रवींद्र वायकर यांच्या प्रवेशामुळे भाजपाचीच नाचक्की झाली आहे, असं संजय राऊतांनी यावेळी सांगितले. 

वायकरांनी ठाकरेंची साथ का सोडली?

शिवसेनेत प्रवेश करताना रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक करत पक्षांतरामागील आपली भूमिकाही स्पष्ट केली. माझ्या विधानसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. काही धोरणात्मक निर्णय सत्तेत असल्याशिवाय होऊ शकत नाहीत. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठीच मतदारसंघातील लोक आपल्याला निवडून देत असतात. आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची सत्ता आहे. देशाचा कारभार ते चांगल्या पद्धतीने करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तातडीने निर्णय घेतात. त्यामुळे मी माझ्या मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आलो आहे, असं रवींद्र वायकर म्हणाले.

टॅग्स :संजय राऊतरवींद्र वायकरउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेभाजपा