“सरकार तुमचेच आहे ना, मग औरंगजेबाची कबर...”; RSSचा उल्लेख करत संजय राऊत काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:06 IST2025-03-18T12:04:03+5:302025-03-18T12:06:36+5:30
Sanjay Raut on Nagpur Violence: छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे भाजपाचे कधीच शौर्याचे आणि विजयाचे प्रतिक नव्हते. महाराष्ट्रातील जनतेने या कारस्थानापासून सावध राहिले पाहिजे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

“सरकार तुमचेच आहे ना, मग औरंगजेबाची कबर...”; RSSचा उल्लेख करत संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut on Nagpur Violence: औरंगजेबाच्या कबरीला हटविण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत भीषण राडा झाला. यातून वातावरण तापले व मोठा जमाव रस्त्यांवर उतरला. यात काही असामाजिक तत्त्वांनी जाळपोळ केली व पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्की केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दगडफेकीत १५ पोलिस जखमी झाल्याचे वृत्त असून रात्री उशिरापर्यंत धरपकड मोहीम राबवत पोलिसांनी २० तरुणांना ताब्यात घेतले. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून, नागपूरकरांना शांतता राखण्याचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे भाजपाचे कधीच शौर्याचे आणि विजयाचे प्रतिक नव्हते. महाराष्ट्रातील जनतेने या कारस्थानापासून सावध राहिले पाहिजे. आम्ही वारंवार सांगत आहोत आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे ते प्रतिक आहे. औरंगजेब आला, अफझलखान, शाहिस्तेखान आला आणि परत गेला नाही. मावळ्यांनी आणि शिवाजी महाराजांनी त्यांची कबर येथेच खणली, हे शौर्याचे प्रतिक आहे. पण RSS संघाची विचारधारा अशी आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे महत्त्व कमी करायचे, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.
दंगली का पेटवल्या जात आहेत? हा महाराष्ट्रात संशोधनाचा विषय आहे
दंगली का पेटवल्या जात आहेत? हा महाराष्ट्रात संशोधनाचा विषय आहे. होळीलाही वातावरण खराब केले. राजापुरात काय केले? होळीसारख्या सणाला महाराष्ट्रात दंगली उसळल्या नव्हत्या. उद्या गुढीपाडव्याला दंगली उसळवण्याचा प्रयत्न करतील. औंरगजेबाची ढाल करून काही लोक दंगली करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबरीचे उदाहरण देत आहेत, बाबरीप्रमाणे आम्ही औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करत आहोत. सरकार तुमचे आहे ना, नरेंद्र मोदी तुमचे आहेत, देवेंद्र फडणवीस तुमचे आहेत, अशी उद्विघ्न प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.
दरम्यान, बाबरीचा लढा वेगळा होता. या लढ्याबाबत बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते, हे त्यांनी समजून घ्यावे. बाळासाहेबांचे स्पष्ट मत होते की, आम्हाला फक्त बाबरीमध्ये रस आहे. आम्हाला एक बाबरी द्या, बाकी सर्व कबरी आणि मस्जिदी तुमच्या आहेत. आम्ही तिथे ढुंकूनही पाहणार नाही. फक्त अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभे करू. जिथे अतिक्रमण झाले, त्याच जागेवर. या देशामध्ये हिंदू मुस्लिम यांनी सामंजस्याने राहिले पाहिजे, तरच देश टिकेल ही बाळासाहेबांची भूमिका होती. रोज उठून एक मस्जिद आणि कबर तोडायची हे हिंदुत्त्व बाळासाहेबांनी कधी रुजवले नाही आणि आम्हाला दिले नाही, असे संजय राऊत म्हणाले.