Sanjay Raut News: लोकसभेचे निकाल महविकास आघाडीच्या बाजूने लागले. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात मोदी आणि शाह यांचा पराभव झाला. आगामी विधानसभा निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढणार आहोत. शिवसेना प्रमुख दोन दिवस दिल्लीत होते. शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत बैठका झाल्या. यापुढे आम्ही एकत्रित प्रचार करणार आहोत, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी महायुतीवर सडकून टीका केली. तसेच अजित पवार यांनी केलेल्या विधानावर भाष्य करताना मोठा दावा केला. मी ७-८ वेळा निवडणूक लढलो, आता मला रस राहिला नाही, असे सांगत अजित पवार यांनी बारामतीतून न लढण्याचे संकेत दिले होते. यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. अजित पवारांऐवजी पुत्र जय पवार यांना बारामतीतून निवडणूक रिंगणात उतरवले जाऊ शकते, असा कयासही राजकीय वर्तुळात बांधण्यात येत आहे. यावर बोलताना संजय राऊतांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
बारामतीकरांनी त्यांचा रस पिळून काढला आहे
अजित पवारांना बारामतीत आता रस राहिला नाही. कारण बारामतीमधील लोकांनी लोकसभा निवडणुकीत त्यांचा रस पिळून काढला आहे. त्यामुळे ते आता त्यांच्या पुतण्याच्याविरोधात कर्जत-जामखेड मतदारसंघामधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. काहीही झाले तरी ते त्यांच्या घरातील व्यक्तीच्या विरोधातच लढतील, अशी शक्यता संजय राऊत यांनी वर्तवली आहे.
दरम्यान, जे-जे पक्षाला सोडून गेले आहेत, त्यांचा आम्ही निवडणुकीत पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत. जेव्हा-जेव्हा शरद पवार यांच्याशी चर्चा केली, तसेच जेव्हा-जेव्हा शरद पवार यांची विधाने ऐकली. तेव्हा त्यांचे हेच म्हणणे आहे की, अजित पवार सोडून बाकीच्या सर्वांना ते परत घेऊ शकतात. मात्र, अजित पवारांना नाही, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे.