Sanjay Raut: हक्कभंग नोटिसीला संजय राऊतांचे उत्तर; सविस्तर खुलासा करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 04:22 PM2023-03-08T16:22:42+5:302023-03-08T16:23:34+5:30
Sanjay Raut: संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाला एक पत्र दिले आहे.
Sanjay Raut: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने दिला. संसदेत पक्षनेतेपदावरून संजय राऊतांना हटवण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. संजय राऊतांच्या जागी गजानन कीर्तिकरांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी, विधिमंडळ नाही चोरमंडळ आहे, असा उल्लेख केला. यानंतर भाजप आणि शिंदे गटाने आक्रमक होत संजय राऊत यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंग आणला. यासंदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली. हक्कभंगाच्या नोटिसीला आता संजय राऊतांनी उत्तर दिले आहे.
संपूर्ण विधिमंडळाबाबत कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसून माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे, हे कृपया लक्षात घ्यावे. तरीही या प्रकरणाबाबत सविस्तर खुलासा करण्याबाबत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाला एक पत्र दिले असून, यामध्ये आपले म्हणणे मांडले आहे. नेमके संजय राऊत पत्रात काय म्हणाले?
या प्रकरणाबाबत सविस्तर खुलासा करण्याबाबत मुदतवाढ द्यावी
मा. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,
जय महाराष्ट्र!
कोल्हापुरातील एका कार्यक्रमात विधान मंडळाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत काही सदस्यांनी आक्षेप घेतला व विशेषाधिकार भंग व अवमानाची सूचना मांडली. याबाबत खुलासा करण्यासाठी आपण मला ०३ मार्च २०२३ पर्यंत सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मुदत दिली.
१) मी आपणास नम्रपणे नमूद करू इच्छितो की, मी दि. ४ मार्चपर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो व कर्नाटकच्या सीमेवरील भागात असल्याने मुंबईशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीत खुलासा करणे शक्य झाले नाही. तरी कृपया सविस्तर खुलासा करण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळावी.
२) महाराष्ट्र विधान मंडळाचा व सदस्यांचा मी नेहमीच आदर करतो. प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे. मी स्वतः अनेक वर्षे राज्यसभेचा सदस्य असल्याने मला अशा संसदीय मंडळांचे महत्त्व माहीत आहे. मी संपूर्ण विधान मंडळाबाबत कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसून माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे. हे कृपया लक्षात घ्यावे.
तरीही या प्रकरणाबाबत सविस्तर खुलासा करण्याबाबत मुदतवाढ द्यावी.
आपला नम्र,
(संजय राऊत)
दरम्यान, संसदेत पक्षनेतेपदावरुन काढून टाकण्यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, टाकू द्या. बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट. चोरांचे मंडळ आहे, विधिमंडळ नाही चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरुन काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. अशी अनेक पदे आम्हाला पक्षाने, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली. जी आम्ही ओवाळून टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही. पदे गेली तरी परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, असे संजय राऊत म्हणाले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"