Sanjay Raut News: उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हे दोन्ही नेते मोदी आणि शाह यांच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवतायत. राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षाचा चेहरा बनले आहेत. दिल्लीत झालेल्या बैठकीत जागावाटपाबद्दल चर्चा झाली. आमच्यात जागावाटपावरुन कोणताही तणाव नाही. आम्हाला असे वाटते की, प्रत्येक जागेवर असा उमेदवार असावा ज्याची ताकद असेल आणि तो तिथे निवडून येईल, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात पैशाचे जे विषारी राजकारण सुरु आहे, त्याचे सूत्रधार हे स्वत: देवेंद्र फडणवीस, भाजपा आणि अमित शाह असे आम्ही मानतो. भाजपला या राज्यातून पूर्णपणे हद्दपार करायचे आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील हे खोके सरकार घालवायचे आहे, असा एल्गार संजय राऊतांनी केला.
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा...
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून काही मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, आमच्यात मतभेद नाहीत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, हे सांगायची ही जागा नाही. भविष्यात लवकरच याबाबत जो निर्णय होईल, तो तुम्हाला कळेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच निवडणुकीला सामोरे जाताना एकत्रितपणे गेले पाहिजे. कोणतेही मतभिन्नता असता कामा नये. मोठा कोण, छोटा कोण, कोण मधला ही भूमिका असता कामा नये. तीनही पक्षांच्या नेत्यांनी सर्व निर्णय एकत्र बसून घ्यायचे, असे ठरवले आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
दरम्यान, मुंबईत येत्या १६ ऑगस्टला तीनही पक्षांचा एकत्र मेळावा असणार आहे. निवडणुकीपूर्वी राहुल गांधी महाराष्ट्रात येणार आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार यांचेही दौरे सुरु आहेत. आमच्यात उत्तम समन्वय आहे, असे संजय राऊत म्हणाले.