Sanjay Raut News: बाबा सिद्दिकी हत्याकांडाचा मुख्य आरोपी गुजरातच्या एका जेलमध्ये आहे. गुजरातच्या एटीएसच्या ताब्यात असलेली व्यक्ती मुंबईतील एका हत्येची जबाबादारी घेते, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. मुंबईतील संपूर्ण गुन्हेगारीचे सूत्रसंचालन गुजरातमधून होत आहे, हे आम्ही गेल्या कित्येक काळापासून म्हणत आहोत. ही घटना त्याचेच एक ज्वलंत उदाहरण आहे. मुंबईतून उद्योग पळवायचे, मुंबईतून पैसा पळवायचा , मुंबईतील माणसांना त्रास द्यायचा, त्यांच्या हत्या करायच्या, याचे सगळे सूत्रसंचालन गुजरातूनमधून सुरू आहे, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
मीडियाशी बोलाताना संजय राऊत यांनी बाबा सिद्दिकी हत्याकांडावरून महायुती सरकारवर शेलक्या शब्दांत टीकास्त्र सोडले. अजित पवार पण सिंघम आहेत. तिथे एक फुल, दोन हाफ सिंघम आहेत. अजित पवारांनी त्यांच्या सहकाऱ्याची हत्या झाल्यावर फक्त निषेध व्यक्त करण्याशिवाय काय केले? खरे म्हणजे अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे. या राज्याची कायदा-सुव्यवस्था कोलमडून पडली आहे. त्याच मंत्रिमंडळात बसत आहात. त्याच मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. तुम्ही काय करत आहात, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.
सामान्य माणसाला घराबाहेर पडायला भीती वाटत आहे
सामान्य माणसाला घराबाहेर पडायला भीती वाटत आहे. कधी कुठून गोळी चालेल आणि कधी कुठून कोयत्याचे हल्ले होतील याचा काही भरवसा राहिलेला नाही. या सगळ्या गुंडांचा वापर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राजकारणासाठी करत आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केला.
दरम्यान, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खोकेगिरी, बोलबच्चनगिरी कमी केली आणि या राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष दिले तर बरे होईल. पब्लिसिटीसाठी बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला गोळ्या घातल्या होत्या. मग आता गोळ्या घाला ना. तुमच्या एका सहकाऱ्याची हत्या होते, त्या गुंडाना पकडण्यात येते मग त्यांनाही गोळ्या घाला. हेच मुख्यमंत्री शिंदे एकेकाळी म्हणाले होते ना की, मुंबईत लॉरेन्स बिश्नोई वगैरे गँग चालणार नाही, मी बघून घेईन, मग आता बघून घ्या, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.