मुंबई: गुगलनेगुजरातमध्ये ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर उघडणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या 'डिजिटल इंडिया' या प्रमुख मोहिमेसाठी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचेही त्यांनी कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या ऐतिहासिक दौऱ्यादरम्यान भेटणं हा माझ्यासाठी सन्मान आहे. गुगल भारताच्या डिजिटायझेशन फंडात १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. तसेच आम्ही गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर सुरु करण्याची घोषणा करत आहोत, अशी माहिती सुंदर पिचाई यांनी दिली.
सुंदर पिचाई यांच्या या घोषणेवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर टीका केली आहे. देवेंद्रजी..हे खरे आहे....? बोला!बोला! मोदींच्या अमेरिका दौऱ्याने महाराष्ट्राला काय मिळाले? मुंबई भारताची आर्थिक राजधानी खरंच आहे ना?, असे सवालही संजय राऊत यांनी ट्विटद्वारे उपस्थित केले आहेत.
दरम्यान, डिजिटल इंडियासाठी पंतप्रधानांची दृष्टी दूरदर्शी आहे. इतर देशही ही ब्ल्यू प्रिंट स्वीकारणार आहेत. गुगलला भारतात एक सिंगल युनिफाईड एआय मॉडेल तयार करायचंय, जे १०० पेक्षा अधिक भारतीय भाषा हाताळण्यात सक्षम असेल. हा कंपनीच्या ग्लोबल प्रयत्नांचा एक भाग आहे. या अंतर्गत कंपनीला जगातील १००० भाषा ऑनलाइन आणायच्यात. यामुळे आपल्या आवडीच्या भाषांमध्ये लोकांना माहिती मिळू शकेल. आयआयटी मद्रासमध्ये रिस्पॉन्सिबल एआयसाठी एका नव्या सेंटरलाही कंपनी मदत करत आहे, असं सुंदर पिचाई म्हणाले.