इजा बिजा तिजा...तिसऱ्यांदा आपटायचे असेल, तर निलेश राणेंनी उभे राहावे; विनायक राऊतांचे थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 05:09 PM2023-03-20T17:09:15+5:302023-03-20T17:15:58+5:30
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपाचे नेते निलेश राणे यांना निवडणुकीत उभे राहण्याचे आव्हान दिले आहे.
कोकणातील रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये राणे कुटुंब आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यातला संघर्ष सर्वश्रूत आहे. रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत. याच मतदारसंघात २००९ रोजी भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांचा विजय झाला होता. मात्र २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी निलेश राणेंचा पराभव केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा विनायक राऊत यांनी निलेश राणेंना आव्हान दिलं आहे.
निलेश राणेंना आम्ही कधीच गीणतीत पकडत नाही. मात्र माझं निलेश राणंना आव्हान आहे...ईजा, बिजा, तिजा.. तिसऱ्यांदा आपटायचे असेल, तर त्यांनी निवडणुकीत उभे रहावे, असं आव्हान विनायक राऊत यांनी निलेश राणेंना दिले आहे. तसेच पराभवाला आमच्या शुभेच्छा आहेत, असंही विनायक राऊतांनी यावेळी म्हटले आहे. त्यामुळे विनायक राऊतांच्या या टीकेवर निलेश राणे काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विनायक राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. बाळासाहेबांचा उल्लेख आम्ही काय करायचा ते या बेईमान लोकांनी शिकवू नये. काल कोकणात सभा घेतली. इकडून-तिकडून लोक जमा केले. तुम्ही सगळीकडे शासकीय विमानाने जाऊन एक तास भाषण करतात, मात्र त्यांचं भाषण सुरु होताच लोक उठून जातात, असा निशाणा विनायक राऊतांनी साधला.
शेतकऱ्यांचे पंचनामे पण होत नाहीत, त्यांना शासनाकडून मदतही केली जात नाहीय. मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्याला यासाठी वेळ नाही. किसान मार्चमधील शेतकरी मृत्यू झाला, कुटुंबाना अर्थसाहाय्य ते करू शकले नाही. खोके द्यायला त्यांच्याकडे पैसे आहेत, असंही विनायक राऊत माध्यमांशी बोलताना यावेळी म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"