Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. महाविकस आघाडीचे सरकार कोसळले. आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. शिंदे गटाला राज्यभरातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपासोबतची २५ वर्षांची युती तोडायला लावणारे पहिले मंत्री एकनाथ शिंदे हेच होते, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
भाजपासोबतची युती तुटणे, महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अस्तित्वात येणे, शिवसेना पक्ष फुटणे, या सर्वाला संजय राऊत जबाबदार आहेत, असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात येतो. याला, संजय राऊत यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना उत्तर दिले. भाजपासोबतची २५ वर्षांची युती तोडायला लावणारे पहिले मंत्री एकनाथ शिंदे हेच होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आमचा छळ होतोय, असे एकनाथ शिंदे यांनीच जाहीरपणे सांगितले होते. त्यांनीच पहिल्यांदा राजीनामा दिला होता, असे संजय राऊत यांनी सांगितले.
ते सगळे खोटे बोलत आहेत
ते सगळे खोटे बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राजीनामा द्यायला निघालेले पहिले मंत्री एकनाथ शिंदे हेच होते. भाजपबरोबर आम्हाला राहायचे नाही. आम्हाला मोकळे करा, असे एकनाथ शिंदे यांनीच जाहीरपणे सांगितले होते. त्यांची अनेक भाषणे आहेत, तुम्ही पाहू शकता, असे संजय राऊत म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस जे सांगतायेत ते खोटे आहे. त्यात तथ्य नाही. देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. राजकीय विरोधकांना फसवून तुरुंगात टाकण्याची ही महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा नाही. ही प्रथा गेल्या ७ वर्षापासून सुरू झाली. आम्ही त्याचे बळी आहोत. पण महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंसारखे सुसंस्कृत मुख्यमंत्री असताना अशाप्रकारे घटना घडणे हे अजिबात शक्य नव्हते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उद्धवजींनीच माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले. माझे आजही त्यांच्याशी कोणतेही वैर नाही. मनात कोणतीही कटुता नाही. पण पाच वर्ष ज्यांच्यासोबत काम केले. त्यांनी माझा एक फोनही उचलला नाही. त्यांनी सौजन्य म्हणूनही माझ्याशी बोलणे योग्य समजले नाही. उलट गेल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर वेगवेगळ्या केसेस कशा टाकता येतील यासाठीचे प्रयत्न झाले. कुठल्याही परिस्थितीत याला अडकवा, आत टाका असे टार्गेटच तत्कालीन सीपी संजय पांडे यांना देण्यात आले होते, असा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"