“रेल्वे ब्रिटिशांनी निर्माण केली अन् काँग्रेसने वाढवली, भाजपाची संपत्ती नाही”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 03:18 PM2024-02-06T15:18:44+5:302024-02-06T15:19:15+5:30
Sanjay Raut Replied BJP: रेल्वे भारतीय संपत्ती आहे. भाजपावाल्यांना समुपदेशनाची गरज आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
Sanjay Raut Replied BJP: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर होते. उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत झाली. हा कोकण दौरा आटपल्यावर उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक चिपळूण ते मुंबई असा प्रवास वंदे भारत ट्रेनने केला. यावरून भाजपाने टोला लगावला. याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.
भाजपाने अधिकृत एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर केली. यात उद्धव ठाकरे यांचा वंदे भारत ट्रेनने प्रवास करतानाचा फोटो शेअर केला. यासह, मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी... वंदेभारत ट्रेनचा आरामदायी प्रवास... तिसरी बार..... मोदी सरकार ! हीच तर मोदींची गॅरंटी आहे. कुठे आहे विकास? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटते. लवकरच बुलेट ट्रेन ची देखील सफर घडवून आणणार हे नक्की कारण, मोदी हैं तो मुमकीन हैं, अशी पोस्ट करत उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला. उद्धव ठाकरेंच्या वंदे भारत ट्रेनच्या प्रवासाबाबत भाष्य करताना भाजपावर टीका केली.
रेल्वे ब्रिटिशांनी निर्माण केली अन् काँग्रेसने वाढवली, भाजपाची संपत्ती नाही
रेल्वे भारतीय संपत्ती आहे. भाजपाच्या बापाची नाही. रेल्वे ब्रिटिशांनी निर्माण केली आणि काँग्रेसने वाढवली. दोन-चार नवीन ट्रेन तुम्ही सुरू केल्या, त्या मालकीच्या आहेत का, देश तुमच्या मालकीचा आहे का, या देशाची सार्वजनिक मालमत्ता आहे, तुमची नाही. भाजपावाले मुर्ख आहेत. त्यांना काऊंसिलिंगची गरज आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी सडकून हल्लाबोल केला.
दरम्यान, कोस्टल रोड, MTHL ही ठाकरेंची गॅरेंटी होती, पण क्रेडीट घेण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते उद्धाटनाची घाई होतेय. MTHL अनेक महिने तयार असूनही उद्धाटनाला विलंब केला आणि आता कोस्टल रोड तयार नसूनही उद्धाटनाची घाई चाललीये. पण तुम्ही कितीही घाई केलीत तरी मुंबईचे हाल करणाऱ्या खोके सरकारला जनतेच्या मनात क्रेडीट मिळणार नाहीच!, असा पलटवार महाविकास आघाडीने भाजपाने केलेल्या पोस्टवर केला आहे.