Join us  

ठाकरे गट म्हणतंय, ८ ते १० आमदार संपर्कात; शिंदेंच्या मंत्र्याने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 1:58 PM

शिवसेनेच्या आमदारांमधील अस्वस्थता वाढल्याने शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये मंगळवारी हमरीतुमरी झाल्याचेही वृत्त काही वर्तमानपत्रांनी दिले.

मुंबई - महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीची एन्ट्री झाल्यानंतर शिवसेना शिंदे गट नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच, मुख्यमंत्री शिंदेंची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमाला अनुपस्थितीही याच नाराजीचे कारण असल्याचे समजते. कारण, शिवसेनेच्या शिंदे गटातील अनेक आमदार गेल्या वर्षभरापासून मंत्रिपदासाठी वाट पाहत आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या नऊ जणांचा अचानक मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता असल्याच्या चर्चा होत्या. त्यातच, शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मोठा दावा केला होता. आता, तो दावा शिवसेना नेते आणि मंत्री संदीपान भुमरेंनी खोडून काढला आहे. 

शिवसेनेच्या आमदारांमधील अस्वस्थता वाढल्याने शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये मंगळवारी हमरीतुमरी झाल्याचेही वृत्त काही वर्तमानपत्रांनी दिले. आमदारांमधील भांडणाचे वृत्त समजताच नागपूर दौरा अर्ध्यावर सोडून मुख्यमंत्री मुंबईत परतले. त्यांच्या उपस्थितीत 'वर्षा' बंगल्यावर आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते, अशी माहिती काहींनी दिली. याच दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार विनायक राऊत यांनी, शिंदे गटातील मंत्रिपद हुकलेले ८ ते १० आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे सांगितले. मात्र, विनायक राऊत यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे मंत्री संदीपान भुमरे यांनी म्हटले. 

शिवसेनेचा कोणताही आमदार कोणाच्याही संपर्कात नाही. यासंदर्भातील वृत्त खोटे असल्याचे संदीपान भुमरे यांनी म्हटले. तर, मंत्री उदय सामंत यांनीही या बातम्यांमधअये कुठलेही तथ्य नसल्याचे सांगत, आमदारांमध्ये भांडणं झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, मुख्यमंत्री राजीनामा देणार ही अफवा आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री होणार हे खोटे आहे. आमच्यावर गेल्या काही काळापासून अत्यंत घाणेरडी टीका होत होती. त्यातूनच आता ही अफवा उठविण्यात आली आहे, असेही सामंत यांनी म्हटले.

काय म्हणाले होते विनायक राऊत

"शिंदे गटाचे ८ ते १० आमदार मातोश्रीच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत. आमच्या संपर्कात असलेल्या आमदारांची नावे माझ्याकडे आहेत पण ती नावं सांगू शकत नाही. पण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदार यात आहेत. ज्यांना मंत्रिपद मिळणार असं वाटत होतं, पण अद्याप मिळालेलं नाही त्यापैकी बहुतेक जण या यादीत आहेत. काहींना असेही वाटत आहे की त्यांची मंत्रिपदे जातील अशा आमदारांचा यात समावेश आहे. तर काहींनी मंत्रिपदाचे कपडेही शिवले होते, तेदेखील या यादीत आहेत," असा दावा विनायक राऊतांनी केला.  

टॅग्स :शिवसेनासंदीपान भुमरेमुंबई